संयुक्त राष्ट्राच्या देखरेखेखाली जनमत चाचणी घ्या! CAA, NRC वर ममता बॅनर्जी आक्रमक

541

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरुच आहे. गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून चौथ्या दिवशीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलनात हजेरी लावत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध केला. संयुक्त राष्ट्राच्या देखरेखेखाली जनमत चाचणी घ्या अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला केली आहे.

स्वातंत्र्यानंतर आता 73 वर्षांनी आम्हाला या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे. स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश लढत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते काय करत होते? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. तसेच भाजप देशात विभाजनाचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहूद्या असे आवाहनही ममतादीदींनी उपस्थित लोकांना केले.

नागरिकता सुधारणा कायदा आणि एआरसीवर जनमत चाचणी घ्या आणि ही चाचणी संयुक्त राष्ट्राच्या देखरेखेखाली घ्या, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. जनमत चाचणीनंतर पाहू कोण जिंकतंय. या चाचणीमध्ये दोन्ही कायद्याला लोकांनी विरोध केल्यास तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, असे आव्हानही ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला दिले. तसेच भाजपला फक्त 32 टक्के मतं मिळाली असून 68 टक्के लोकांनी नाकारले आहे हे देखील विसरू नका, असेही ममतादीदींनी सुनावले.

आपली प्रतिक्रिया द्या