आमदार सोडून जातील, या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत, पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल. दुसरीकडे मंत्रिमंडळातील अनेक निर्णय फडणवीसच घेत असतात. शिंदे गटातील प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. तसे न झाल्यास आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जातील, अशी भीती मुख्यमंत्री शिंदेंना आहे. शिंदे गटाचे संख्याबळ कमी झाल्यास राज्य सरकार संकटात येऊ शकते. त्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, फॉक्सकॉनपाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेला. तरीही राज्याचे प्रमुख काहीच बोलत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला

सांगली-पेठ रस्ता चारपदरी व्हावा, यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही निवेदन दिले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना टोल न बसविता रस्त्याचे काम केले. सांगली-डिग्रजपर्यंत चारपदरी रस्ता केला. काहीठिकाणी तीन पदरी रस्ता झाला. शिवाय महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती झाली. मात्र, हा रस्ता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला होता. त्यामुळे दुरुस्ती करता आली नाही. मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याची घोषणादेखील केली आहे. रस्त्याचा डीपीआर तयार झाला आहे. भूसंपादनाची तयारी झाली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत निविदा निघेल. मात्र, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी केंद्राने निधी देणे आवश्यक आहे. या रस्त्याबाबत माझ्यावर टीका झाली. मात्र, वास्तविक ही टीका केंद्र सरकारवर होती. त्यांनी केंद्रालाच उघडे पाडले, असा टोला त्यांनी भाजपला लगाविला.

शिर्डीत होणार राष्ट्रवादीचे शिबिर

देश व राज्य पातळीवर सुरू असलेल्या घडमोडी व भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 4 व 5 नोव्हेंबरला शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन ः वेध भविष्याचा’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रातील सत्ताधाऱयांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. त्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे जयंत पाटील म्हणाले.