एअर इंडियाला ‘खासगी’ पंख; महाराजा विकणे आहे!

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाचे अखेर खासगीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्गुंतवणुकीकरणास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. प्रचंड कर्ज आणि तोट्य़ाच्या ओझ्यामुळे दबलेल्या एअर इंडियाच्या ‘महाराजा’ची आता विक्री होणार असून त्या दिशेने उड्डाण केले आहे.

एअर इंडियाचे खासगीकरण होणार असे संकेत काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि नागरी उड्डाणमंत्री गणपती राजू यांनी दिले होते, मात्र एअर इंडियाच्या खासगीकरणास कर्मचाऱ्यांचा विरोध होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले आणि निर्गुंतवणुकीकरणास तत्त्वतः मंजुरी दिली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका गटाची स्थापना करावी अशी शिफारस नीती आयोगाने केली होती. त्यानुसार अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला जाईल. एअर इंडियाच्या समभाग विक्रीसंदर्भातील रूपरेषा आणि तपशील ठरविण्यात येणार आहे.

टाटांकडून टाटांकडे येणार
एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टाटा उद्योग समूहाकडून मोठा समभाग खरेदी केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये काही विदेशी कंपन्यांचाही शेअर्स खरेदीत सहभाग असण्याची शक्यता आहे. विशेषतः हिंदुस्थानातील विमानसेवेचा पाया टाटा समूहाने रचला आहे. १९३२ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी कराची ते मुंबई पहिले विमानाचे उड्डाण केले. जे. आर. डी. टाटा हे हिंदुस्थानातील पहिले पायलट होते. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ ला जेआरडींनी विमान कंपनीचे एअर इंडिया असे नामकरण केले. जगातील पहिले जेट असलेले एअर इंडिया कंपनी होती. टाटा उद्योग समूहाची खासगी कंपनी असलेल्या एअर इंडियाची मालकी सरकारकडे १९५३ ला गेली. आता पुन्हा एअर इंडिया टाटा उद्योग समूहाकडे येण्याची शक्यता आहे.

६० हजार कोटींच्या कर्जाचा बोजा
खासगी विमान कंपन्यांच्या स्पर्धेमुळे सरकारी विमानसेवा देणाऱ्या एअर इंडियावर गेल्या काही वर्षांपासून कर्जाचा बोजा वाढत गेला. एअर इंडियावर सुमारे ६० हजार कोटींचे कर्ज आहे. यातील ३० हजार कोटींचे कर्ज वर्किंग कॅपिटल आहे. सध्या कर्जावरील वार्षिक व्याज ४५०० हजार कोटींचे आहे. एअर इंडियाचे समभाग आणि इतर स्रोत विकून हे कर्ज परतफेड केली जाणार आहे. विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज यामुळे परतफेड केले जाऊ शकेल. उर्वरित ३० हजार कोटींचे कर्ज केंद्र सरकारने ‘राइट ऑफ’ करावे अशी शिफारस नीती आयोगाने केली आहे.

निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारची तत्त्वत: मान्यता; १४० विमानांचा ताफा
एअर इंडिया देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. १४० विमानांचा ताफा आहे. यातील ४१ विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी तर ७२ विमानांची देशांतर्गत सेवा आहे. बाजारभावाप्रमाणे या कंपनीचे 17 टक्के समभाग असून देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एकूण विमान प्रवाशांमध्ये मात्र १४.६ टक्के वाटा एअर इंडियाचा आहे. इतर खासगी कंपन्यांचा जलद विस्तार होत असताना एअर इंडियाच्या प्रवासी संख्येत मात्र घसरण होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या