रविवारी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल?, उमा भारती नाराज

40
modi-amit-shah

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चुकलेले आर्थिक ठोकताळे, रेल्वेचे वाढते अपघात, पंजाब-हरियाणात झालेली दंगल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे अडचणीत सापडलेल्या पंतप्रधान मोदींनी देशाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदलाची तयारी सुरू केली आहे. रविवारी सकाळी १० वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या निमित्ताने मोदींच्या मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार होणार आहे.

काल (गुरुवारी) पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अमित शहा यांनी सध्या कार्यरत असलेल्या भाजपच्या काही मंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर गुरुवारी रात्रीच भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. राजीवप्रताप रुडी, संजीव बाल्यान, निर्मला सीतारमन, कलराज मिश्र, महेंद्रनाथ पांडेय यांचे राजीनामे सादर झाले आहेत. पांडेय यांची उत्तर प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी गुरुवारीच नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातसह काही राज्यांमध्ये लवकरच होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच २०१९ मध्ये होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. काही मंत्र्यांकडे असलेला अतिरिक्त खात्यांचा भार हलका करण्यात येणार आहे, तसेच काही मंत्र्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. कामगिरीचा आढावा घेऊन काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार आहे.

मनोहर पर्रिकर गोव्याच्या राजकारणात पुन्हा गेल्याने संरक्षण खात्याचा भार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आहे. तर, व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती प्रसारण खात्याचा भार स्मृती इराणी यांच्याकडे आहे. तर अनिल दवे यांच्या मृत्यूमुळे पर्यावरण मंत्रायलयाची जबाबदारी हर्षवर्धन यांच्याकडे आहे. रेल्वेच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरेश प्रभू यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.

उमा भारती नाराज

केंद्रीय मंत्री उमा भारती मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाल्यामुळे नाराज झाल्या आहेत. उमा भारती यांनी आपली नाराजी ट्वीट करुन जाहीर केली आहे.

uma-tweets

आपली प्रतिक्रिया द्या