गोरेगाव खाडीवर होणार केबल पूल, अंधेरी ते गोरेगाव वेग वाढणार; 418 कोटींचा खर्च

गोरेगाव खाडीवर पालिकेच्या माध्यमातून तब्बल 418 कोटी 53 लाख 30 हजार रुपयांचा खर्च करून पालिका केबलचा पूल बांधणार आहे. आकर्षक रोषणाई असलेल्या चार लेनच्या या पुलामुळे अंधेरी ते गोरेगाव या भागातील वाहतूक वेगाने होणार असून वाहतूककोंडीतून सुटकाही होणार आहे.

गोरेगाव खाडी येथे 36.6 मीटरचा डीपी रोड आहे. 1991 च्या डीपी प्लॅनमध्ये गोरेगाव खाडीचा हा भाग पुलासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. यानुसार पालिकेच्या माध्यमातून गोरेगाव खाडीवर केबल आधारित पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल 500 मीटरचा असेल. या पुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. गोरेगाव खाडी परिसरात खासगी मालकीची जमीन असून त्या ठिकाणी 350 झोपडय़ा आहेत. या झोपडय़ा अधिकृत किंवा अनधिकृत याची छाननी पालिकेच्या अंधेरी पश्चिम व गोरेगाव पश्चिम विभाग कार्यालयामार्फत होणार आहे. यात झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत विभाग कार्यालय निर्णय घेणार आहे.

पालिकेने मागवल्या निविदा

या पुलाच्या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या असून पात्र निविदाकार सल्लागाराची नियुक्ती करून वन विभाग व सीआरझेडची परवानगी घेण्यात येणार आहे. या ठिकाणी टाटा पॉवर पंपनीच्या केबल असून त्या हटवण्याबाबत पंपनीशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंना 26 विद्युत खांब असून पुलावर 11 विद्युत खांब असणार आहेत.