बूच लागल्यावर…

27

मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कच-याने मुंबईला बूच लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो हे असे बूच लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे.

डॉ. दीपक अमरापूरकर हे मुंबईतील मुसळधार पावसात बेपत्ता झाले व तिसऱया दिवशी त्यांचा मृतदेह वरळी समुद्राजवळ सापडला. उघडय़ा गटारामध्ये ते पडले व तिथून ते वाहत गेले. देश एका नामांकित पोटविकारतज्ञास मुकल्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. आम्ही स्वतः डॉ. अमरापूरकर यांना ओळखत होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणात ते ‘मातोश्री’वर येत होते व शिवसेनाप्रमुखांवर उपचार करीत होते. त्यामुळे त्यांचे हे असे जाणे नुसते चटका लावणारे नाही, तर धक्कादायक आहे. निसर्गाचे रौद्ररूप असे भयंकर असते की, त्याने किती जणांचा बळी घेतला आहे याचे हिशेब नंतर समजतात. मुंबई-ठाण्यात अनेक निरपराध्यांना २९ ऑगस्टच्या निसर्ग तांडवाचा फटका बसला असून कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. भेंडीबाजार परिसरात ११७ वर्षांची जुनी इमारत कोसळून त्यात ३३ जणांना प्राण गमवावे लागले, अनेक जण गंभीर जखमी झाले. त्या इमारतीचा क्षणात मातीचा ढिगारा झाला व अनेक हसती खेळती कुटुंबे त्या ढिगाऱयाखाली कायमची दबली गेली. मुसळधार पावसात

जुन्यामोडकळीस आलेल्या

इमारती कोसळण्याच्या दुर्घटना होतात व लोक प्राणास मुकतात. म्हाडाने धोकादायक ठरवूनही या इमारती रिकाम्या केल्या जात नाहीत व असे अपघात झाल्यावर धावाधाव होते, एकमेकांवर खापर फोडले जाते. मुंबई शहरात १२ हजार इमारती जीर्ण झाल्या आहेत व अखेरचा श्वास घेत आहेत. त्या धोकादायक इमारतीत हजारो कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असतील तर त्यास जबाबदार कोण? राज्याचे गृहनिर्माण खाते नेमके करते काय? एका बाजूला ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखवायची व दुसऱया बाजूला मुंबईसारख्या शहरास पक्के गृहनिर्माण धोरण नाही. बडय़ा बिल्डरांचे ‘टॉवर्स’ ज्या वेगाने उभे राहतात व बिल्डरांच्या फायलींना सरकारदरबारी जी गती मिळते तो वेग गरीबांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या नशिबी नसतो. पुनर्विकासाचे विषय हे अस्पृश्यच ठरतात व एस.आर.ए. प्र्रकल्पांची पाने पुढे सरकत नाहीत. तिथे सर्वच पातळीवर भ्रष्टाचार आहे. मुंबईत ज्या इमारतींची तातडीने पुनर्बांधणी आवश्यक आहे अशा आजच्या घडीला १४ हजार इमारती उद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी

अतिधोकादायक

ठरलेल्या इमारतींची संख्या वाढत आहे व अशा इमारती कोसळून त्यात माणसे मरत आहेत. मग ही माणसे म्हाडाच्या हलगर्जीपणामुळे मेली की महापालिकेच्या बेफिकिरीमुळे मृत झाली असे एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रकार दुसरी इमारत कोसळेपर्यंत सुरूच राहतात. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करायला हव्यात, पण त्या इमारतींमधील रहिवाशांनी राहायला जायचे कुठे, याचे उत्तर आज कुणाकडे नाही. ‘ट्रान्झिट कॅम्प’ म्हणून जो काही प्रकार आहे त्यापेक्षा ‘नरक’ किंवा छळछावण्या बऱया. त्यामुळे लोक मोडकळीस आलेल्या इमारतीत राहून मरण पत्करतात, पण त्या ‘ट्रान्झिट कॅम्प’मध्ये जायला धजावत नाहीत. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते, पण मुंबई पुन्हा त्याच वेगाने धावू लागते. मुंबईत एका दिवसात ३१५ मिलीमीटर पाऊस पडला व जलप्रलय आला. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. बेकायदेशीर वस्त्या व त्यांनी फेकलेल्या प्लॅस्टिक कचऱयाने मुंबईला ‘बूच’ लागले आहे. एक महिन्याचा पाऊस जेव्हा एका दिवसात कोसळतो व हे असे ‘बूच’ लागल्यावर काय करायचे, याचा विचार करायची वेळ आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या