स्टेज शोसाठी या सर्कशीत बसणार नाही! व्हर्च्युअल सुनावणीत येणाऱ्या अडचणींमुळे संतापलेल्या न्यायमूर्तींचे उद्गार

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश न्यायालयांचे काम हे व्हर्च्युअल पद्धतीने सुरू आहे. व्हर्च्युअल सुनावणीसाठी चांगल्या दर्जाची इंटरनेट सुविधा गरजेची आहे. ती नसेल या अशा प्रकारच्या सुनावणीत अडथळे येऊ शकतात. खराब इंटरनेटचा फटका कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना बसला आहे. सुनावणीदरम्यान खराब कनेक्टिव्हिटीमुळे येणाऱ्या अडचणींमुळे न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य हे जबरदस्त संतापले होते. त्यांनी उत्तम कनेक्टिव्हिटीची जबाबदारी असलेल्या प्रभारी अधिकाऱ्याला फोन लावायला सांगितला आणि त्याला तिथल्या तिथेच खडसावले. 11.10 वाजता सुरु झालेली सुनावणी तब्बल 15 वेळा खंडीत झाल्याने न्यायमूर्ती संतापले होते.

संतापलेल्या न्यायमूर्ती भट्टाचार्य यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत ही समस्या सोडवली जात नाही आणि विनाखंड सुनावणी सुरू होत नाही तोपर्यंत न्यायदानासाठी बसणार नाही. भट्टाचार्य म्हणाले की ‘मी फक्त स्टेज शो आयोजित करण्यासाठी न्यायालयात बसणार नाही.’ त्यांनी आपला हा निर्णय प्रभारी मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि रजिस्ट्रार जनरल यांना कळवला आहे. न्यायमूर्ती भट्टाचार्य यांनी म्हटले की ‘हे न्यायालय कनेक्टिव्हिटीचा मुद्दा सोडवत नाही तोपर्यंत सुरू करणं शक्य नाही. मी न्यायासाठी येणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली असल्याने अशा पद्धतीच्या सर्कशीचा मी हिस्सा होऊ शकत नाही. मी एसी खोलीत बसलोय आणि न्यायाची अपेक्षा करणारी लोकं बाहेर उन्हात आणि धुळीत तिष्ठत उभी आहेत’

इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने न्यायालयाच्या कामकाजात अडथळे येत आहेत. या सगळ्याला मी वैयक्तिकरित्या दोषी मानतो असंही न्यायमूर्ती भट्टाचार्य यांनी म्हटलंय. कोलकाता न्यायालयाची उज्ज्वल परंपरा आहे. या न्यायमंदिरामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने लोकांना न्याय दिला जाऊ शकत नाही, ही शरमेची बाब असल्याचं भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या