Kolkata Rape Case : डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी CBI चौकशी होणार, हायकोर्टाचे आदेश

कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात आरजी. कर मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या मजल्यावरच्या सेमिनार हॉलमध्ये एक डॉक्टर तरुणी मृतावस्थेत सापडली होती. याप्रकरणात एका आरोपीला अटक केली होती. या घटनेत समाधानकारक तपास न झाल्याच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. मात्र मंगळवारी न्यायालयाने सर्व दस्ताऐवज तत्काळ सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.

कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत डॉक्टर तरुणी बलात्कार आणि हत्ये प्रकरणातील सर्व दस्ताऐवज सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संपावर गेलेल्या डॉक्टरांना संप मिटविण्याचे उच्च न्यायालयाने केले आहे. न्यायालयाने सांगितले की हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे. सोमवारी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्य़ा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, जर कोलकाता पोलीस रविवारपर्यंत तपास करु शकले नाहीत तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येईल.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अधिवक्ता बिलावदल भट्टाचार्य म्हणाले की, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे विधान केले होते, मात्र विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर, अशी वेळ आली होती. हा विलंब अत्यंत घातक ठरेल, असे आम्हाला वाटते. कारण उच्च न्यायालयानेही पक्षकारांचा युक्तिवाद उच्च न्यायालयासमोर ऐकून घेतला होता. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) ने आज मंगळवारपासून देशव्यापी संपाची घोषणा केली होती. यामध्ये देशभरातील ओपीडी सेवा बंद ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र, याआधी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA )नेही देशभरात संप पुकारण्याची घोषणा केली होती.