महिलांनी सोशल मीडियावर ‘सेक्सी लूक’मध्ये येऊ नये, कंबोडियाच्या पंतप्रधानांचे आदेश

1482

कंबोडियामध्ये महिलांनी फेसबुकवर ‘सेक्सी लुक’ मधील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत. फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे कपडे आणि ब्यूटी प्रोडक्टच्या विक्री दरम्यान महिलांनी तोकडे कपडे घालण्यावर सरकारने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, महिलांनी या आदेशाला विरोध करण्यास देखील सुरुवात केली आहे. असे आदेश काढणे हे भयंकर असून याला कोणताही आधार नाही, असे आरोप महिलांकडून करण्यात येत आहेत.

कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, लो कट टॉप्स घालणे हा देशाच्या संस्कृतीवर एकप्रकारे हल्ला आहे. त्यांनी प्रशासनाला आदेश दिला आहे की, फेसबुकवर दाखवण्यात येणाऱ्या व्हिडीओमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये दिसणाऱ्या महिलांवर बंदी आणावी. ‘कंबोडियन नॅशनल काउंसिल फॉर वुमेन’ला दिलेल्या आदेशात पंतप्रधान हुन सेन म्हणतात की, ‘तोकड्या कपड्यातील महिलांपर्यंत पोहोचून तुम्ही त्यांचे लाइव्ह स्ट्रीम थांबवा. त्या पूर्ण कपडे परिधान करून येत नाहीत तोपर्यंत व्हिडीओ काढण्यापासून रोखा.’

‘तोकडे कपडे परिधान करणं हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. अशा प्रकारच्या पोशाखामुळे महिलांविरोधातील अत्याचार, लैंगिक शोषण असे प्रकार वाढीस लागतात’, असे पंतप्रधानांचे मत आहे. कंबोडियात पोलिसांनी यासंदर्भात एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक महिला कंबोडियाची परंपरा आणि महिलांच्या सन्मानाला तडा दिल्यामुळे माफी मागत असल्याचे दिसत आहे.

पोलिसींनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. फेसबुककडून कंबोडियातील या सरकारी आदेशासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. कंबोडियाच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते खिउ सोफीक यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या आदेशानुसार प्रशासन काम करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या