हातातला कॅमेरा फेकून तो चिमुरड्यांचा जीव वाचवण्यासाठी धावला पण…

17

सामना ऑनलाईन। सीरिया

सोशल साईटवर नेहमीच सीरियातील युध्द,तिथला नरसंहार,रक्तपात यांची मन हेलावणारी छायाचित्र आणि व्हिडिओ पाहावयास मिळतात. अशाच एका घटनेच्या फोटोने आणि व्हिडिओने सोशल साईटवर खळबळ उडवली आहे.  हा फोटो सीरियाच्या अब्द अलकादिर हबक या प्रेस फोटोग्राफरचा आहे. गेल्या आठवड्यात  सीरियातील संघर्षाचे चित्रीकरण करताना बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्यांचा जीव वाचवण्यासाठी अब्दने कॅमेरा फेकून त्यांच्याकडे धाव घेतली खरी. पण तोपर्यत त्या चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता.

आपल्या डोळ्यासमोर दोन लहानगे तडफडत मृत्यूमुखी पडले मात्र आपण  काहीच  करु शकलो नाही हा आघात अब्दला सहन झाला नाही आणि तो तिथेच हमसाहमशी रडू लागला. हा सगळा घटनाक्रम दुसऱ्या एका कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात टिपला. हा व्हिडिओ सोशल नेटवर्कींग साईटवर प्रचंड मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे.


गेल्या आठवड्यात सीरियातील शरणार्थींना घेऊन जाणाऱ्या एका बसजवळ बॉम्बस्फोट झाला होता. इसिसने घडवलेल्या या स्फोटात १२६ जण ठार झाले होते. मृतांमध्ये ८० लहान मुलांचा समावेश होता. हा स्फोट घडला त्यावेळी अब्द तिथे फोटोशूट करत होता. त्याचवेळी स्फोटात गंभीर जखमी झालेली काही मुल वेदनेने विव्हळत असल्याचे त्याच्या नजरेस पडले. हे दृश्य बघताच क्षणाचाही विलंब न करता ‘अब्द’ने कॅमेरा बाजूला ठेवला आणि मुलांच्या दिशेने धाव घेतली. तो धावत एका मुलाजवळ पोहचला पण तोपर्यत त्या मुलाचे प्राण गेले होते. त्यानंतर अब्द दुसऱ्या मुलाच्या दिशेने धावला पण त्यावेळी तोही शेवटच्या घटका मोजत होता. त्यानंतर काही क्षणातच त्यानेही मान टाकली. आपल्या समोर दोन लहानग्यांचा जीव गेलेला बघून अब्द तिथेच कोसळला आणि ढसाढसा रडू लागला.

आपली प्रतिक्रिया द्या