‘रोड शो’ने मुसलमानांची मते मिळतील?

55

सामना ऑनलाईन, वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा रोड शो आज वाराणसीतील मुस्लिम मोहल्ल्यांतून जात असताना त्यात मुसलमानांची गर्दी खेचण्याचा भाजपचा प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला पण तरीही मोदी मुसलमानांची मते खेचण्यात कितपत सफल होतील याविषयी साशंकता निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया रोड शोनंतर ऐकायला मिळाल्या.

मोदींच्या वाराणसी मतदारसंघात विधानसभेच्या किमान तीन जागांवर सपा आणि काँग्रेसची एकजूट भाजपवर मात करू शकते. त्यामुळे भाजपचे नेते कमालीचे हवालदिल झालेले दिसतात. विधानसभेच्या ४०३ जागा असलेल्या आमच्या राज्यात भाजपने किती मुसलमान उमेदवार दिलेत? एकसुद्धा नाही. इथे आमच्या समाजाची लोकसंख्या २० टक्के आहे. मग एकाही जागेसाठी भाजपला चांगला उमेदवार मुसलमानांतून सापडला नाही काय? आम्ही मोदींना आणि त्यांच्या पक्षाला मते द्यायची कशासाठी, असा सवाल अनेक मुसलमान तरुणांनी विचारला.

“२०१४ मध्ये आम्ही काही मुसलमान तरुणांनी मोदींनाच मतदान केले होते, पण ही गोष्ट भाजप कार्यकर्त्यांना नंतर सांगितली तेव्हा अविश्वासाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्यामुळे कोणी मुसलमानाने भाजपला मत दिले तरी ते कोणाला खरे वाटणार नाही.” – झुबेर अहमद

“मोदी हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. वाराणसीचा विकास झाला तर आमचीही प्रगती होईल. पण भाजपच्या लोकांना आमचा समाज मुळात आवडतच नाही.”
– रफिक अहमद, ज्येष्ठ व्यापारी, मदनपुरा.

“मोदी यांनी वाराणसीतून निवडून गेल्यानंतर येथील विणकरांच्या प्रश्नांकडे अजूनही लक्षच दिलेले नाही. शिवाय केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा जबरदस्त फटका विणकरांना बसला आहे. पंतप्रधानांनी काही करावे या आशेने आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत.”
अब्दुल रऊफ, विणकर.

आपली प्रतिक्रिया द्या