आक्रमकता हेच माझे हत्यार त्याशिवाय मी खेळू शकत नाही!

18

सामना ऑनलाईन । केपटाऊन

हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली मैदानावरील आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. अनेकवेळा अतिआक्रमकपणामुळे त्यांच्यावर आजी-माजी खेळाडूंनी टीका देखील केली होती. मात्र आक्रमकता हेच माझे हत्यार असून त्याशिवाय मी खेळू शकत नाही असे विराट कोहलीने म्हटले आहे. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६० धावांची खेळी करत कारकिर्दीतील ३४ वे शतक झळकावले. या खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने आफ्रिकेला १२४ धावांनी धूळ चारली.

केपटाऊनमधील सामना संपल्यानंतर कोहली म्हणाला की, ‘मी या वर्षी ३० वर्षांचा होईल आणि ३४ ते ३५ वर्षापर्यंत मला याच पद्धतीने खेळत राहायचे आहे. त्यामुळे या मी खूप प्रयत्न आणि एक्सरसाईज करतो कारण मला आक्रमक क्रिकेट खेळणे आवडते. जर माझ्यामधील आक्रमकता संपली तर मी मैदानावर काहीच करू शकत नाही. मला माझी आक्रमकता जपून ठेवायची आहे आणि त्यासाठी मी कसरतही करत आहे. मी माझ्या खुराकावरही नियंत्रण ठेवले आहे. संघाला जेव्हा गरज असते तेव्हा मी १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो.

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना धावा बनवणे एवढे सोपं नाही. गोलंदाजांचा वेग आणि खेळपट्टीचे स्वरुप यानुसार तुम्हाला तुमच्या खेळामध्ये बदल करणे आवश्यक असतो. मात्र मला याचा आनंद जास्त होतोय की मी ९० धावांच्या आसपास असल्यानंतर थकलो होतो मात्र तरीही मी शेवटपर्यंत फलंदाजी केली. तुम्ही तुमच्या क्षमता ओळखून खेळता तेव्हा तो अनुभव अद्भूत असतो, असेही कोहली म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या