50 वर्षातील सर्वात बेकार पंतप्रधान! कॅनडाच्या पंतप्रधानांना दुहेरी धक्का

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत हिंदुस्थानचा हात असल्याचा संशय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी व्यक्त केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढत चालला असून याचा थेट फटका जस्टिन ट्रुडो यांना आगामी निवडणुकांमध्ये बसणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. जस्टिन ट्रुडो यांची मतदारांमधील लोकप्रियता कमी होत असल्याचे नुकत्यात झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

कॅनडामध्ये 2025मध्ये निवडणुका होणार आहे. मात्र याआधी करण्यात आलेल्या सर्व्हेने पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या लिबरल पार्टीची चिंता वाढली आहे. कॅनडाच्या ग्लोबल न्यूजसाठी IBSOने नुकताच एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये पंतप्रधानपदासाठी विरोधीपक्षाचे नेते पियरे पोईलिव्रे यांना सर्वाधिक मतदारांनी पसंती दर्शवली आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 39 टक्के लोकांनी पियरे पोईलिव्रे हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे म्हटले, तर जस्टिन ट्रुडो यांच्या बाजुने फक्त 30 टक्के मतं पडली.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडामध्ये शिख समुदायाची लोकसंख्या जास्त असून ही मतं आपल्या बाजुने वळवण्यासाठी ट्र्रुडो यांनी हिंदुस्थानवर आरोप केला. मात्र याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होत असल्याचे सर्व्हेतून दिसून आले.

विशेष म्हणजे 2021मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ट्रुडो यांना पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. त्यांच्या सरकारला खलिस्तानी समर्थक जगमीत सिंह धालीवाल यांच्या नेतृत्वाखालील न्यू डेमोक्रेटिक पार्टीचा (एनडीपी) टेकू घ्यावा लागला होता. एनडीपीच्या मदतीनेच ट्रुडो पंतप्रधान झाले आणि सरकार तरले. याच जगमीत सिंह धालीवाल याच्या दबावामुळे ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप हिंदुस्थानवर लावल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हा राजकीय खेळ त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे.

शुभनीत सिंहचे बदलले सूर, कॉन्सर्ट रद्द झाल्य़ावर म्हणाला, हिंदुस्थान माझाही देश

दरम्यान, याआधी जुलैमध्ये कॅनडात करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये जस्टिन ट्रुडो हे गेल्या 50 वर्षातील सर्वात बेकार पंतप्रधान असल्याचे समोर आले होते. तर दुसरीकडे 1968 ते 1979 आणि 1980 ते 1984 या काळात कॅनडाचे पंतप्रधान राहिलेले त्यांचे वडील पियरे ट्रुडो हे मतदारांमध्ये लोकप्रिय होते.

दोन्ही देशांतील संघर्ष टोकाला; कॅनडाच्या नागरिकांना हिंदुस्थानात प्रवेश बंदी