आचाऱ्याला साडे ११ लाखांचे बक्षिस दिल्याने पंतप्रधान वादात

सामना ऑनलाईन । ओटावा

कॅनाडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केलेला हिंदुस्थान दौरा वादामध्ये सापडला आहे. या दौऱ्यामध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांनी विक्रम विज नावाच्या एका आचाऱ्याला चांगले जेवण बनवण्याबद्दल साडे अकरा लाखांचे बक्षिस दिले होते, तर कॅनाडाच्या हॉकी संघासाठी जर्सी बनवणाऱ्याला त्यांनी ३ हजार ६०० डॉलरचे बक्षिस (२ लाख ४७ हजार रुपये) दिले होते. कॅनडातील कंजरवेटिव पार्टीने पंतप्रधान करदात्यांचा पैशांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे.

बुधवारी कंजरवेटिव पार्टीने संसदेमध्ये सादर केलेल्या दस्तऐवजांद्वारे सरकारद्वारे एक हजारपेक्षा जास्त अमेरिकी डॉलरच्या खर्चाची बिलं (बक्षिसाचाही समावेश) संसदेमध्ये सादर करण्यात यावी अशी मागणी केली आहे. कंजरवेटिव नेते अॅण्ड्र्यू शिर यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर टीका केली आणि करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान जस्टीन ट्रुडो फेब्रुवारीमध्ये नऊ दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. त्याच्यासोबत मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार आणि इतर अधिकारी होते. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी व्हीआयपी आचारी विक्रम विज याला दोन हिंदुस्थानी थाळ्यांची मेजवाणीसाठी तब्बल साडे अकरा लाखांचे बक्षिस दिले होते. नवी दिल्लीतील कॅनडाच्या दूतावासामध्ये हा जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विक्रम विज हे मूळचे हिंदुस्थानी असून कॅनडामध्ये स्थाईक झालेले आहेत. विज यांच्या हिंदुस्थान दौऱ्याचा सर्व खर्च कॅनडा सरकारने केला होता आणि यावरूनच कंजरवेटिव पार्टीने पंतप्रधानांना निशाणा बनवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या