पैठणीवरील जीएसटी रद्द करा! विणकरांनी घेतली अर्थमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट

44

सामना प्रतिनिधी, येवला

महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या हातमाग पैठणी साडीकरीता लागणाऱ्या कच्च्या मालावरील (रेशीम व जरी) तसेच पैठणी विक्रीवर लागू होणारी जीएसटी कराची विशेष बाब म्हणून सूट मिळावी अशी मागणी येथील विणकरांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. यासाठी शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्र्याची भेट घेऊन वास्तवता मांडली.

आज शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये हातमागावरील पैठणी उत्पादनाशी निगडित पाच ते सहा हजार कुटुंब असून सुमारे चार हजार हातमाग आहेत. यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. कुटुंबातील लहान मोठे सर्वच स्त्री पुरुष या व्यवसायात गुंतलेले आहेत. बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे हा व्यवसाय तोट्यात सुरु असून जवळपास ३० टक्के हातमाग बंद अवस्थेत आहेत. तसेच बाहेरील राज्यातील यंत्रमागावरील डुप्लिकेट पैठणीमुळे हे क्षेत्र संकटाच्या गर्तेत सापडले आहे.

यंत्रमागावरील उत्पादीत डुप्लिकेट पैठणीमुळे आगोदरच हा व्यवसाय संकटात सापडला असताना जीएसटीमुळे हे क्षेत्रच लुप्त होईल की काय ही शंका उत्पन्न होत आहे. पैठणी ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत कुठलाही टॅक्स नसावा अशी मागणी विणकरांनी केली आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह येथील कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे,भांडगे पैठणीचे संचालक राजेश भांडगे, भाजपा वस्त्राsद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, प्रवीण पहिलवान, मनोज भागवत, सचिन वडे, प्रेमकुमार शर्मा, सुनील लक्कडकोट, किरण भांडगे, पांडुरंग भांडगे, श्रीनिवास ठाकूर, शिरीष पेटकर, अमोल असलकर आदीच्या शिष्टमंडळाने या मंत्र्याची भेट घेऊन पैठणीचे वास्तव मांडत जीएसटी रद्द करण्याची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या