सार्वजनिक दसरा देखरेख समिती रद्द करण्याची मागणी

93

सामना प्रतिनिधी । हिंगोली

सार्वजनिक दसरा महोत्सव समितीवर नियंत्रणासाठी नेमलेली समिती सर्वसमावेशक नसल्याचा आरोप करत ही समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागील दोन दिवसापुर्वी सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी 163 वर्षाची परंपरा लाभलेल्या दसरा समितीवर नियंत्रणासाठी पाच सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी दिलेल्या निवेदनात, हिंगोलीत सार्वजनिक महोत्सव समितीच्या माध्यमाने मागील दिड महिन्यापासुन विविध समिती प्रमुखांनी सोपविलेले नियोजन अंतिम टप्यात पोचले आहे. या समित्या सर्वसमावेशक असुन लोकप्रतिनीधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

संपूर्ण कामकाज उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बैठकीतून करण्यात आले आहे. ऐनवेळी आपण दसरा महोत्सव समितीच्या कामकाजावर नियंत्रणासाठी देखरेख समिती नियुक्त केली आहे. या समितीत अशासकीय सदस्य निवड सर्वसमावेशक नसल्याने ही समिती रद्द करण्यात यावी. वास्तविक मागील वर्षी आपल्या कार्यालयातील नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांनी दसरा महोत्सवाची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडली. असे असतांना सर्वसामान्यातुन कुठलीही मागणी नसतांना देखील देखरेख समितीवर अशासकीय सदस्यांची निवड प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. यामुळे अशा प्रकारे समिती निवड करायची असल्यास अनेक वर्षापासुन दसरा महोत्सवात काम करणार्‍या सदस्यांचा समावेश करणे अपेक्षीत होते. मात्र असे या देखरेख समिती निवडीत दिसत नसल्याने ही निवड रद्द करुन आपल्या कार्यालयातील नेमलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांमार्फत दसरा महोत्सवातील कामकाज सांभाळले जावे यामुळे कामकाजात अधिक पारदर्शकता येईल असे नमुद केले आहे. निवेदनावर सुर्यकांत अण्णा गोटरे, बाबाराव घुगे, चंदु लव्हाळे, विलास गोरे, राजेंद्र हलवाई यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या