आश्वासनाची पूर्ती करा, धनगर समाजाच्या तरुणांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या! शिवसेनेची आग्रही मागणी

651

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या समाजाच्या तरुणांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमुळे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी आग्रही मागणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानदेखील त्यांनी  या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

रविवारी महादेव जानकर पुरस्कृत धनगर समाजाचा मेळावा मुंबईमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मेळाव्याला हजर राहणार आहेत. या मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गेल्या अनेक दिवसांपासूनची धनगर तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य करत तसा आदेश काढावा आणि हे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. “2014 साली बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी केलेल्या आंदोलनापर्यंत धनगर समाजाचा तरुणांनी अनेक आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमुळे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले त्यामुळे यातील अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांची ससेहोलपट झाली.  त्यामुळे या तरुणांवर जे गुन्हे किंवा खटले जोरजबरदस्तीने दाखल करण्यात आले ते मागे कधी घेणार?” असा सवाल शिवसेनेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे

 

आपली प्रतिक्रिया द्या