कर्क

2842

”तुमच्याकडून एखादी चूक झाली तर होऊ द्या, परंतु पुन्हा ती होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर ग्रहांनी दिलेला योग्य समय अहंकाराने फुकट घालवाल.”

दिवाळी फारच उत्साहाची व आनंदाची जाणार आहे. मनातील अनेक इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान असेल. उन्नतीच्या मार्गाने तुमची वाटचाल होणार आहे. लक्ष्मी-कुबेर पूजन व दिवाळी पाडवा या दिवशी मनाची द्विधा अवस्था होईल. पूजन मात्र योग्य पद्धतीने कराल. भाऊबीजेच्या दिवशी एखादी सुखद घटना घडल्याने उत्साह वाढेल. नव्या व्यवसायाला सुरुवात करता येईल. क्षेत्र कोणतेही असो, तुमचा प्रगतिरथ चौफेर धावणार आहे. तुम्ही प्रयत्न करा. यश मिळेलच. वर्षभर कन्या राशीत गुरू महाराज राहणार आहे. कर्केच्या पराक्रमातून गुरुचे भ्रमण होणार आहे. तुमचे सोनेरी स्वप्न पूर्ण होण्याचा कालावधी आहे. २६ जानेवारी २०१७ शनी धनु राशीत प्रवेश करीत आहे. २३ जून २०१७ शनी वक्री होऊन वृश्चिकेत येत आहे. जून ते आक्टोबर तुमचा भाग्योदयाचा मोठा कालावधी असेल. २६ ऑक्टोबरला शनी पुन्हा धनु राशीत प्रवेश करत आहे. तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे तुमच्या सहवासात येतील. आप्तेष्ट, मित्र यांना मदत करावी लागेल. षष्ठ स्थानातील शनी तुम्हाला अधिक परिपक्व करणार आहे. १८ ऑगस्ट २०१७ कर्क राशीत राहू व मकर राशीत केतू प्रवेश करीत आहे. तुमच्या प्रगतीवर विपरीत परिणाम मात्र ते करणार नाहीत. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. नोकरी-व्यवसायात मोठी उडी घेता येईल. पूर्वीचा एखादा शत्रू तुमच्या बरोबर पुन्हा मैत्री करायला येण्याची शक्यता या वर्षात आहे. कोर्टकचेरीचे प्रकरण मिटवता येईल. डिसें., मेमध्ये प्रवासात सावध रहा. मनावर दडपण येईल. तणाव होऊ शकतो. तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुम्ही मनाप्रमाणे यश मिळवाल. फेबु., मार्च, एप्रिल मान-सन्मानाचा योग येईल. तुमच्या योजना गतिमान झाल्याचे समाधान मिळेल. १२ सप्टेंबर २०१७ गुरू तूळ राशीत प्रवेश करीत आहे. तुमचा मार्ग अधिक व्यापक होणार आहे.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे कार्य व्यापक स्वरूप धारण करेल. प्रगतीची घोडदौड चौफेर होईल. लोकसंग्रह वाढेल. लोकोपयोगी योजना गतिमान होतील. तुमच्याकडे अधिकार येतील. मान-प्रतिष्ठा वाढेल. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. ग्रहांची साथ तुम्हाला आहे. स्त्रीया, मुले, अपंग आशा लोकांसाठी विशेष कार्य करून दाखवता येईल. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. आक्टो., नोव्हें., डिसें. तुमचे डावपेच यशस्वी होतील. जाने., मार्चमध्ये विरोधक मैत्री करण्यासाठी प्रयत्न करतील. जुलैनंतर तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक प्रशस्त होईल. थोरा-मोठय़ांचा सहवास मिळेल. चांगल्या गोष्टी शिकावयास मिळतील. दौऱयात यश मिळेल. जुना वाद व गैरसमज संपवता येईल. कोर्ट केस मिटू शकेल. डिसें. व मेमध्ये किरकोळ दुखापत संभवते. वाद जास्त वाढवू नका.

नोकरी-व्यवसाय:

नोकरीत तुमचे वर्चस्व सिद्ध होईल. मनाप्रमाणे बदल नोकरीत करता येईल. बेकारांना नोकरी लागेल. परदेशी जाण्याची संधी मिळेल. संशोधन कार्यात विशेष यश मिळवता येईल. धंद्याला मोठे स्वरूप देता येईल. नवे कंत्राट मिळेल. धंद्यात चांगला जम बसेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने पुढील भविष्यासाठी गुंतवणूक करा. फायदेशीर ठरेल. आक्टो., नोव्हें. उत्साहवर्धक घटना घडेल. आत्मविश्वास वाढेल. जाने., मार्चमध्ये मनावर दडपण येईल. एप्रिल, मेमध्ये जबाबदारी वाढेल. जूनमध्ये किरकोळ तणाव होईल. सर्व परिस्थितीवर मात करू शकाल. डिसें. पोटाचा आजार संभवतो. जवळच्या व्यक्तीसाठी वेळ व पैसा खर्च होईल. २७ मेमध्ये प्रवासात सावध रहा. मनाने खंबीर माणूस नेहमीच पुढे जातो.

विद्यार्थी व तरुणवर्गासाठी:

तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे तुमची प्रगती उच्च दर्जाची होईल. ग्रहांची साथ आहे. मेहनत घ्याल तेवढे यश अधिक मोठे होईल. ध्येयासाठी लक्ष ठेवून काम करा. जुने अपयश पुसून टाकता येईल. परदेशी शिक्षण घेता येईल. आवडत्या क्षेत्रात पाऊल टाकता येईल. वेळ फुकट घालवू नका. प्रसिद्धी व पुरस्कार मिळवता येईल. जाने., मार्च व जूनमध्ये शत्रुत्व होऊ शकते. मनावर संयम ठेवा. वाद वाढवू नका. मेमध्ये वाहन जपून चालवा. नोव्हें. व जुलैमध्ये प्रेमात फसगत संभवते.

महिलांसाठी:

भरपूर कष्ट करण्याची व यश मिळवण्याची तुमची ईर्षा असते. या वर्षात तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे चांगले वर्चस्व सिद्ध कराल. मान-प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. आप्तेष्ठ व मित्र यांचा गोतावळा वाढेल. जाने., मार्चमध्ये अचानक मनावर दडपण येईल. गैरसमज होईल. जूनमध्ये जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. या वर्षीची दिवाळी तुमची फारच जोरात असेल. मौल्यवान खरेदी होईल. घर, जमीन, वाहन इ. खरेदी होईल.

आपली प्रतिक्रिया द्या