मृत्यूआधी ‘तिच्या’सोबत लग्नाची इच्छा, प्रेमवीरांसाठी ‘तो’ बनलाय हिरो

71

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

‘प्रेमसाठी कायपण’ हा डायलॉग आपण फक्त सिनेमामध्ये ऐकला आहे. प्रत्यक्षात तसं काही नसतं असंही आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल. मात्र याचा खरा प्रत्यय अमेरिकेतल्या जॉर्जिंया प्रांतातील अटलांटा शहरातील एका प्रेमी युगुलाकडे पाहून येऊ शकतो.

अटलांटा शहरातील डस्टिन स्नायडर हा १९ वर्षीय तरुण एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. डस्टिनला दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर झाला असून त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे, मात्र डॉक्टरांनी हात वर केले असून त्याच्याकडे खूप कमी वेळ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे डस्टिन खूप कमी वेळात जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने आपल्या अनेक इच्छा कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांकडे व्यक्त केल्या आहेत. मात्र त्याची एक इच्छा अद्यापही पूर्ण झालेली नाही. डस्टिनला आपली शाळेतील मैत्रिण सिएरा सिवेरोसोबत लग्न करायचं आहे.

प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती ज्याच्यावर प्रेम करत असते तीच सर्व जग असल्यासारखं वाटत असतं. डस्टिनचंही तसंच आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘सिएरा हेच माझं संपूर्ण जग आहे. माझ्यासाठी तीच सर्वकाही आहे. मी माझ्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही.’ डस्टिनच्या प्रेमाबाबत लोकांना समजलं तेव्हा त्यांनी त्याच्या खऱ्या प्रेमाला सलाम केला आहे. त्याची ही प्रेम कथा इंटरनेटवर व्हायरल झाली असून तो सध्या प्रेमवीरांसाठी हिरो ठरला आहे.

डस्टिन आणि सिवेरा यांची प्रेम कथा ते सहावीमध्ये असताना सुरू झाली होती. याबाबत बोलताना सिवेरा म्हणाली की, ‘हो, खरंच तो माझे पहिले प्रेम आहे’. दोघांमध्ये काही काळासाठी प्रेमसंबंधही होते मात्र महाविद्यालयीन शिक्षणानंतर दोघेही इतर ठिकाणी गेल्याने त्यांची ताटातूट झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची भेट झाली आहे. २८ जानेवारी, २०१८ला त्यांचे लग्न होणार आहे. त्यांचे एकमेकांप्रती खरे प्रेम पाहून अनेकांनी त्यांना लग्नासाठी आर्थिक मदतही देऊ केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या