एक -दोन नाही तर पोटातील नऊ भाग कापून काढले, वाचा कर्करोगमुक्त झालेल्या हंसा राघवानी यांची कहाणी

4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कर्करोग म्हणजे काही एकच रोग नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या रोग समूहास कर्करोग म्हणून संबोधलेले आहे. सर्व कर्करोगांमधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. कर्करोग हा जीवघेणा असून त्यासाठीचे उपचार हे देखील अनेकांसाठी त्रासदायक ठरतात. या उपचारांमधून जात असताना रुग्ण शारीरिकरित्या थकतोच शिवाय मानसिकरित्याही खचण्याची दाट शक्यता असते. अतितीव्र स्वरुपाच्या कर्करोगाशी झुंजत त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिद्दी रुग्णांच्या कहाण्या इतर रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरतात. अंबरनाथला राहणाऱ्या एका महिलेची कहाणी आजपर्यंत कोणीही सांगितली नव्हती. ही कहाणी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या वाचकांसमोर मांडत आहोत. कुटुंबवत्सल अशा या महिलेने एक स्वप्न पाहिलं होतं. या स्वप्नासाठी तिने कर्करोगाशी निकराने लढा दिला. तिचा हा लढा पाहणारे डॉक्टरही अचंबित झाले होते. तिचा विषय निघाला की डॉक्टरांना तिच्या झुंजार स्वभावाविषयी किती बोलू , असं होत असतं.

सर्वसामान्यमहिलांप्रमाणेच, 43 वर्षाच्या हंसा राघवानी या अंबरनाथच्या रहिवासी. नवरा, एक मुलगा आणि एक मुलगी असं त्यांचं चौकोनी कुटुंब. या हसत्याखेळत्या अशा या कुटुंबावर मोठा आघात झाला तो हंसा यांना कर्करोग झाल्याचे कळताच. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आभास कोसळलं. हंसा यांच्या लघवीचे प्रमाण वाढल्याचे निमित्त झाले आणि हंसा यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही चाचण्या केल्या होत्या, ज्यात त्यांना कर्करोगाची पहिली लक्षणे दिसून आली.

22 मार्च 2022 रोजी हंसा पहिल्यांदा मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात आल्या. मनात भयंकर चलबिचल, अस्वस्थता, भीती, नैराश्य अशा सगळ्या भावना त्यांच्या मनात एकत्रितरित्या दाटून आल्या होत्या. त्यांचे पती आणि मुले त्यांना आधार देत होते, मात्र ते सगळे आतून कोलमडलेले होते. कर्करोग हंसा यांना झाला होता मात्र भीतीने त्यांच्या घरचे पोखरले गेले होते. पुढचे जवळपास 7 महिने म्हणजे 27 सप्टेंबर 2022 पर्यंत हंसा यांच्यावर केमोथेरपी सुरू होती. हे सात महिने हंसा आणि त्यांच्या घरच्यांना अनेक वर्षांप्रमाणे वाटले होते. केमोथेरपी संपल्यानंतर हंसा आणि त्यांच्या घरच्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. संकटे दूर झाली म्हणून सगळ्यांनी मनोमन प्रार्थना केली. मात्र दुर्दैवाने असं झालं नाही. हंसा यांचे 10 ऑक्टोबर 2022 रोजी पेट स्कॅन करण्यात आले. ही चाचणी कर्करोगाची शरीरात लक्षणे आहेत अथवा नाही हे तपासण्यासाठी केली जाते.

कर्करोगतज्ज्ञ शल्यविशारद डॉ.संकेत मेहता यांना तो दिवस आजही लख्खपणे आठवतो. 11 वेळा केमोथेरपीतून बाहेर आलेल्या एक मध्यमवर्गीय महिलेचे पेट स्कॅन अहवाल त्यांच्यासमोर ठेवण्यात आले होते. अहवाल त्यांना बारकाईन पाहण्याचीही गरज पडली नाही , कारण हंसा यांच्या शरीरात कर्करोग बळावल्याने डॉ.मेहता यांनी स्पष्टपणे दिसत होते. अहवालात एकच गोष्ट पाहण्याची राहिली होती की कर्करोगाने किती नुकसान केले आहे. हंसा यांच्या गर्भाशय आणि त्या खालच्या भागामध्ये कॅन्सरची बऱ्यापैकी मोठी आणि जाडसर गाठ होती. डॉ.संकेत यांनी वेळ न दवडता हंसा यांना रुग्णालयात दाखल करून घेतलं. यापुढची परिस्थिती ही आणखी बिकट होणार होती….

हंसा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा डॉ.संकेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला. सल्लागार कर्करोगतज्ज्ञ डॉ.बोमन धाबरही हंसा यांच्यावरील उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ताफ्यात सामील झाले होते. हंसा यांच्या शरीरात कर्करोग झपाट्याने पसरला होता, त्यांना लागोपाठच्या केमोथेरपीमुळे बराच थकवा जाणवत होता, त्यातच आता एक मोठं ऑपरेशन करावे लागणार हे सांगितल्याने त्या पूर्णपणे कोलमडल्या होत्या. मनातून त्या घाबरल्या होत्या, मात्र त्यांनी तसं जाणवू दिलं नाही. त्यांना आधार देण्याची गरज असताना त्याच त्यांच्या कुटुंबियांना आधार देत होत्या. ‘मला काही होणार नाही, काळजी करू नका असं त्या घरच्यांना ठामपणे सांगत होत्या’ मात्र आजवर त्यांनी केलेल्या प्रार्थना या कामी आल्या नव्हत्या ज्यामुळे मनातून घाबरलेल्या होत्या.

डॉ.संकेत आणि डॉ. बोमन यांनी हंसा यांच्यावर शस्त्रक्रियेची तयारी केली. पुढे ज्या असामान्य गोष्टी घडणार होत्या, त्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हंसा यांच्यावर शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. त्यांची ही शस्त्रक्रिया बराच वेळ चालली. या शस्त्रक्रियेमध्ये एक -दोन नाही तर हंसा यांच्या पोटातील 9 भाग काढून टाकण्यात आले. गर्भाशय आणि आसपासच्या भागात कॅन्सर पसरला असल्याने गर्भाशय, गर्भनलिका, प्लीहा, अंडाशय, मोठे आतडे आणि त्याच्या आसपास असललेला ऊतींचा जाडसर थर, पोटाच्या खालच्या बाजूला असलेल्या पोकळीचा काही भाग असे विविध भाग शस्त्रक्रियेने काढण्यात आले. यानंतर हंसा यांना विविध औषधे, प्रतिजैविके यांच्याआधारे जलदगतीने बरं करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हंसा काही काळ व्हेंटीलेटरवर होत्या. पोटातील 9 भाग काढण्यासाठी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर कोलमडला असता, मात्र हंसा राघवानी कोलमडल्या नाहीत, त्यांचा कणखर चेहरा आजही डॉ.संकेत आणि डॉ.बोमन यांना आठवतो. डॉ.संकेत म्हणाले की, ‘हंसा यांनी लढाऊ बाण्याचे दर्शन घडवले. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोणामुळे त्या या महाभयंकर परिस्थितीतून बाहेर पडू शकल्या.’ डॉ.बोमन यांच्या मते तर हा चमत्कारच आहेत ते म्हणाले की, ‘हंसा यांनी शस्त्रक्रियेला सामोरं जाण्यापूर्वी 11 केमोथेरपींचा सामना केला होता. मी त्यांच्या जिद्दीला सलाम करतो. माझ्या आयुष्यातील ही सगळ्यात वेगळी आणि चमत्कार म्हणता येईल अशी केस आहे.’

हंसा राघवानी या सांगतात, ”मला खात्री होती की मी कॅन्सरला हरवणारच, आणि मी ते करून दाखवलं. नवरा आणि मुलं यांच्यामुळे मला लढण्याची ताकद मिळाली. वोक्हार्ट रुग्णालयामुळे मला नवे जीवन मिळाले, ज्यामुळे माझ्या सुनेचा आणि माझ्या मुलीचा तिच्या लग्नात मेकअप करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे असं हंसा यांनी गंमतीने म्हटले. कॅन्सरच्या हलक्याशा लक्षणांकडेही दुर्लक्ष करून नका, चाचण्या करून घ्या आणि कॅन्सर जरी झाला असला तरी खचू नका असा सल्ला हंसा यांनी दिला आहे.