डोंबिवलीतील फ्लॅटमध्ये गांजाची शेती;1 किलो 3 ग्रॅम गांजा केला जप्त

डोंबिवलीच्या पलावा सिटीतील एका घरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने कारवाई करून पोनिक पद्धतीने केली जाणारी गांजाची शेती उद्ध्वस्त केली. पैसे कमवण्यासाठी गांजाची शेती करणाऱया अर्शद खत्री आणि जावेद जहांगीर शेखला एनसीबीने अटक केली. त्या घरातून एनसीबीने 1 किलो 3 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. गांजाची शेती करण्यासाठी दुबईतील तस्कर रिहान खान हा पैसे पुरवत असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे.

पलावा सिटीत एक जण घरात गांजाची शेती करत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने कारवाई करून गांजाची शेती उद्ध्वस्त केली. पोनिक पद्धतीने गांजाच्या शेतीसाठी एक टू बीएचके फ्लॅट घेण्यात आला होता. अर्शद हा मरीन इंजिनीअर असल्याने त्याला पोनिक पद्धतीने गांजाच्या शेतीची माहिती होती. अर्शद व जावेद हे दोघे काही महिन्यांपासून गांजाची शेती करत होते. गांजाच्या शेतीसाठी लागणारे साहित्य एनसीबीने जप्त केले आहे. तर पोनिक पद्धतीने गांजाची शेतीसाठी लागणारा खर्च हा रिहानने दिल्याचे तपासात समोर आले आहे. या गांजासाठी लागणारे बियाणे हे परदेशातून येते. काही महिन्यांत तयार होणारा हा गांजा प्रत्येकी 8 हजार रुपये ग्रॅमने विकला जातो. त्या गांजाचे व्यसन हाय प्रोफाइल पार्टीमध्ये केले जात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते.

कोकेन विकणारा नायजेरियन गजाआड 

लॉकडाऊन काळात कोकेनची तस्करी करणाऱया आफ्रिकन नागरिकाला एनसीबीने अटक केली. ओनूराह सॅम्युअल असे त्याचे नाव आहे. तो अंधेरी लोखंडवाला येथे कोकेनची विक्री करत असायचा. त्याला काही दिवसांपूर्वी नायजेरियन व्यक्ती हा भेटला होता. तो कोलंबिया येथून पोटातून 50 कोकेन असलेल्या कॅप्सूल घेऊन मुंबईत आला होता. त्याने त्या कॅप्सूल सॅम्युअलला दिल्याचे तपासात समोर आले आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीने त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या