उसाच्या शेतात गांजाचे आंतरपिक घेणाऱ्याला अटक

माण तालुक्यातील मार्डी येथील एका व्यक्तीने शेतात चक्क गांजाची शेती केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दहीवडी पोलिसांनी कारवाई करून सुमारे 9 लाख 9 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. राहुल तुकाराम गायकवाड (रा. मार्डी, ता. माण) असे संशयिताचे नाव आहे.

मार्डी येथील शेतकऱ्याने ऊस, मका व घास गवत लावून त्याच्यामध्ये गांजाची शेती केल्याची माहिती दहीवडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस पथकासह मार्डी येथे छापा टाकला. या छाप्यामध्ये संशयित गायकवाड हा शेतामध्ये गांजाची शेती करून तो गांजा विक्री करत असल्याचे आढळून आले. या कारवाईत 9 लाख 9 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व ए. के. निर्मळ, सहायक फौजदार बी. जे. हांगे, एस. एन. केंगले, आर. एस. बनसोडे, पी. बी. कदम, एन. एस. रासकर, टी. जी. चंदनशिवे, जी. सी. डगे तसेच होमगार्डचे जवान यांनी केली.