फटाक्यांशिवाय दिवाळी असू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाची कबुली

31

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. फटाके फोडण्यावर नाही. ‘फटाकामुक्त दिवाळी’ असू शकत नाही हे आम्हालाही कळते, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने लोकांना 9 ऑक्टोबरच्या आपल्या बंदी आदेशाआधी खरेदी केलेले फटाके फोडण्यास मुभा दिली.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र फटाक्यांची विक्री त्यानंतरही सुरूच आहे. आम्ही ते मीडियातून पाहत आहोत. फटाक्यांशिवाय दिवाळी शक्य नाही याची कल्पना आम्हाला आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात काही विक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली.

न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर ९ ऑक्टोबर रोजी बंदी घातली आहे. या बंदीमुळे फटाकाविक्रीच्या व्यवसायात मोठी गुंतवणूक केलेल्या व्यापाऱयांना मोठा फटका बसेल, असे नमूद करत फटाकाविक्रेत्यांनी बंदी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी याचिकेत केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मात्र फटाकाविक्रीवरील बंदीच्या आपल्या आदेशात बदल करण्यास नकार दिला. तसेच येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत घातलेली ही बंदी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत कायम राहील असेही स्पष्ट केले. त्याचवेळी ९ ऑक्टोबरच्या आपल्या बंदी आदेशाआधी खरेदी केलेले फटाके फोडण्यास लोकांना न्यायालयाने मुभा दिली. प्रदूषणाची पातळी घटली काय याची तपासणी दिवाळीनंतर करू, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्याचेही आदेश दिले.

फटाका विक्रीवरील न्यायालयाच्या बंदी आदेशाला धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ते दुःख देणारे आहे. – सर्वोच्च न्यायालय

पंजाब-हरयाणात फटाके फोडण्यासाठी तीनच तास
पंजाब, हरयाणा आणि चंदिगड येथील जनतेला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने संध्याकाळी ६.३० ते रात्री ९.३० या तीन तासांतच फटाके फोडण्यास आज अनुमती दिली. ही अनुमती यंदाच्या दिवाळीपुरतीच आहे असे स्पष्ट करतानाच फटाक्यांची विक्री घटलीच पाहिजे, असे न्यायमूर्ती ए. के. मित्तल आणि न्यायमूर्ती अमित रावल यांच्या खंडपीठाने बजावले.

आपली प्रतिक्रिया द्या