‘ या’ शहरातील लोकांनी आंघोळ करणं बंद का केलं ?

84

सामना ऑनलाईन । केपटाऊन

दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन शहरातील नागरिकांनी आता दररोज आंघोळ करणं बंद केलं आहे. तसे आदेशच शहरातील प्रशासनाने नागरिकांना दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेला सध्या भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी केप टाऊन शहराच्या प्रशासनाने एक अनोखी शक्कल लढवली असून शहरातील नागरिकांना फक्त आठवड्यातून दोनदाच आंघोळ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आंघोळीसाठी शॉवरच्या वापरावर देखील बंदी घातली असून बादलीत पाणी घेऊनच आंघोळ करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

केपटाऊन शहरात गेल्या तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे या शहरात दुष्काळ पडला असून प्रशासनाने नागरिकांवर पाणी वाचविण्यासाठी अनेक निर्बंध लावले आहेत. दुष्काळामुळे या शहरातील नागरिकांना दिवसाला प्रत्येकी ५० लीटर पाणी वापरण्याचे आदेश दिले आहेत. साधारणपणे शॉवरखाली आंघोळ केल्यास आणि फ्लशसाठी पाणी वापरल्यास ३० लिटर पाणी वाया जातं. पाण्याची ही उधळपट्टी दुष्काळात परवडणारी नसल्याने केपटाऊनमध्ये पाण्यासंदर्भात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. आंघोळीसाठी, कपडे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी टॉयलेटमध्ये पुन्हा वापरण्यास सांगण्यात आले आहे. तसेच टॉयलेटमधील फ्लश टॅंकचा वापर देखील बंद करण्यास सांगितला आहे.

शहरातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारे लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. “केपटाऊनमध्ये दुष्काळामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे आता आम्ही फक्त लोकांना पाणी वाचवा म्हणून सांगणार नाही तर पाणी वाचविण्यासाठी त्यांना भाग पाडू” असे केपटाऊन शहराच्या महपौर पॅट्रिशिया डी लीली यांनी सांगितले.

…म्हणून हिंदुस्थानी खेळाडूंना २ मिनिटात उरकावी लागतेय अंघोळ!

केपटाऊन शहरातील या पाणी बचतीचा फटका हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना देखील बसला होता. इथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान आणि त्यापूर्वीच्या सरावादरम्यान भयंकर उकाड्याचा सामना करणाऱ्या क्रिकेटसंघाला फक्त दोन मिनिटांत आंघोळ उरकण्याचे आदेश देण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या