अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार ? आज अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

पंजाबच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग हे आज म्हणजेच मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास अमरिंदर सिंग हे दिल्लीला रवाना झाले असून आजच संध्याकाळी भाजपच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या सगळ्या शक्यतांच्या चर्चेत अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवी ठकुराल यांनी अमरिंदर सिंग यांचा दौरा हा खासगी असल्याचं सांगितलं. दिल्लीत ते त्यांच्या काही मित्रांना भेटणार असून ते दौऱ्यादरम्यान कपूरथळा हाऊस रिकामे करणार असल्याचं ठकुराल यांनी ट्विटद्वारे सांगितले.

अमरिंदर सिंग यांनी याच महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर चरणजितसिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री बनले आहेत. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. स्थानिक वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी नवज्योतसिंग सिद्धू हा अत्यंत धोकादायक माणूस असल्याचं म्हटलं होतं. सिद्धू आणि कॅप्टन यांच्यातील संघर्षामुळेच अमरिंदर यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. हे सगळं नाट्य घडल्यानंतर मंगळवारी सिद्धू याने पंजाबच्या काँग्रेसअध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या