रहाणे ‘कॅप्टन कूल’ मालिकेचा वारसदार

52

>>द्वारकानाथ संझगिरी

एका  कसोटीत अजिंक्य रहाणे हा ब्लूचीप शेयरसारखा सर्वांना हवाहवासा वाटायला लागला. गंमत म्हणजे कोहलीला खिजवण्यासाठी तो ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि पत्रकारांचाही लाडका झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडू स्वतः अतिरेक्यासारखे वागतात, पण त्यांना समोरचा माणूस हा महात्मा गांधी, विवेकानंद किंवा बुद्धासारखा हवा असतो.

पुरुषाच्या हातावर भाग्यरेषा कधी उमटेल ते सांगता येत नाही.

या मोसमात काही काळ रहाणे मुंबईत लोकलला लटकणाऱ्या प्रवाशासारखा हिंदुस्थानी संघाला लटकतोय असं वाटत होतं. विराट कोहलीने त्याला डब्यात बसायला जागा करून दिली. विराटचा त्याच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास दिसतोय. का नसावा? त्याने हिंदुस्थानबाहेर विशेषतः इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियात आपलं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलंय. आधीच्या कसोटीत त्रिशतक केलेल्या फलंदाजाला वगळून फॉर्मात नसलेल्या फलंदाजाला घेणं हे सोपं नसते. पण कोहलीने ती हिंमत दाखवली. एवढंच नाही तर रहाणेला नेतृत्व दिल्यावर रहाणेनेही पाच फलंदाज घेऊन खेळायची हिंमत केली. त्याच्या दोन्ही डावांतल्या खेळी महत्त्वाच्या होत्या. पहिल्या डावात पंडित नेहरूंच्या ‘लिव्ह डेंजरसली’ या तत्त्वज्ञानाप्रमाणे तो खेळला. दुसऱ्या डावात तो अफलातून खेळी खेळला. त्या खेळीने मी पाहिलेल्या जुन्या अनेक खेळींच्या आठवणी जाग्या झाल्या.

१९६४ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटीत हिंदुस्थानच्या आठ विकेट्स गेलेल्या. जिंकायला पस्तीसेक धावा हव्या होत्या. पहिल्या डावात शून्य धावा केलेला चंदू बोर्डे फलंदाजीला उतरला. थेट आक्रमण केलं आणि त्या पस्तीसेक धावांचा पाठलाग चुटकीसारखा संपला.

१९७१ साली ओव्हलवर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी आणि सीरिज जिंकायला १७१ धावा हव्या होत्या. पाठलाग कुंथत कुंथत सुरू होता. फारुख इंजिनीयर आला. त्याने थोडी जोखीम उचलली. अशाच तीस एक धावा फटाफट संपवल्या.

१९७३ साली पंच्यांशी धावांचा जिंकण्यासाठी पाठलाग करताना हिंदुस्थान पराभवाच्या छायेत दिसायला लागला. सलीम दुराणी गिफर्ड या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजाला आखाडासदृश खेळपट्टीवर पुढे सरसावला आणि दोन षटकार चढवले. मामला खतम! मी सलीमभाईला नंतर विचारलं, ‘दोन षटकार चढवताना काय विचार होता?’ तो म्हणाला, ‘उसे बॉस कौन है दिखाना था.’

रहाणेने ‘बॉस कौन है’ हे कमिन्स आणि ऑस्ट्रेलियाला एक हूक आणि एका एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्हच्या षटकाराने दाखवलं. पुजारा धावचीत झाल्यावर अनेकांच्या पोटात उगाच गोळा उठला होता. रहाणेने चटकन मॅच संपवली.

खेळाडू कितीही गुणवान असला तरी गुणवत्तेला आकार देण्यासाठी एखादा ‘वेडा कुंभार’ लागतो. ती भूमिका रहाणेच्या बाबतीत त्याचा वैयक्तिक प्रशिक्षक प्रवीण अमरे निभावतोय. अजिंक्यचा फिरणाऱ्या चेंडूसमोरचा बचाव सुधारण्याची मोहीम त्याने तीन-चार महिन्यांपूर्वीच हाती घेतली. त्यासाठी जोरदार सराव केला. त्याचबरोबर उसळत्या चेंडूला हिंदुस्थानी खेळपट्ट्यांवर कसं आक्रमक प्रत्युत्तर द्यायचं आणि दादागिरी करायची याचीही तयारी प्रवीणने रहाणेकडून करून घेतली. हिंदुस्थानी खेळपट्ट्या मंद असतात. त्यामुळे एखादा चेंडू अनपेक्षितपणे उसळला तर तो जास्त घातक ठरतो. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर तुम्ही उसळत्या चेंडूची अपेक्षा ठेवता. हिंदुस्थानात ठेवत नाही. रामदेवबाबा उद्या डिस्को डान्सवर बोलला तर तो धक्का आपल्याला बसेल तसा चेंडू हिंदुस्थानात गुडलेंग्थच्या आसपासवरून उसळला की बसतो. म्हणून हा सराव केला. प्रवीण अमरेने त्याला ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ हे पुस्तक वाचायला दिलं का? त्याचा नेतृत्वासाठी चांगला उपयोग होऊ शकतो असे प्रवीणला वाटले. मनात सकारात्मक विचार येण्यासाठी रहाणे लोणावळय़ाला पार्थसारथीच्या गीता प्रवचनालाही जातो. तो रस्ताही प्रवीणनेच दाखवला. आणखी एक ‘रस्ता’ प्रवीण चक्क रहाणेच्या दारात घेऊन आला. प्रवीण कोलकात्याला ब्लॅककॅट कमांडोजच्या शिबिरात गेला होता. त्यांचं ट्रेनिंग, त्यांची क्षणात निर्णय घ्यायची क्षमता त्याने पाहिली आणि मित्रत्वाच्या नात्यातून एक कमांडो त्याने एमसीएवर रहाणेची शारीरिक आणि निर्णय घ्यायची क्षमता वाढवून घेण्यासाठी आणला. रहाणेचा मूळ स्वभाव शांत असेल, पण त्याला बर्फाचं रूप द्यायची प्रक्रिया या सर्व गोष्टींनी केली. विराट कोहलीचा ‘यूएसपी’ त्याची सदैव जागृत आक्रमकता आहे. त्याचा बर्फ करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अमित शहाला साधनशूचितावादी एम. एस. जोशी करणं आहे. पण त्याची अधूनमधून दुधासारखी उतू जाणारी आक्रमकता शमवण्यासाठी त्याने ध्यानसाधनेचा गुरू शोधला पाहिजे. रहाणे हा वाडेकर, अर्जुना रणतुंगा, धोनी या ‘कॅप्टन कूल’च्या मालिकेतला आहे. विराट हा दादा गांगुलीचा वारसदार आहे. हिंदुस्थानी क्रिकेटसाठी दोघांची गरज आहे. फक्त हा चांगला की तो याची तुलना करून दोघांच्या मैत्रीत विष कालवलं जाऊ नये. १९८४ साली देशभरातून फक्त दोन खासदार आल्यानंतर भाजपला पुन्हा वर यायला जेवढी लालकृष्ण आडवाणींची गरज होती तेवढीच वाजपेयींची होती. हेच तत्त्व इथे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या