
महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी लंडनने रविवारी अविस्मरणीय क्षण अनुभवला. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026च्या निमित्ताने प्रतिष्ठत वॉटरलू ब्रिजवर आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅप्टन्स कार्निव्हल’ने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. पहिल्यांदाच हा ऐतिहासिक पूल एका विशाल क्रिकेट मैदानात रूपांतरित करण्यात आला आणि त्यावर जगातील 12 संघांच्या कर्णधारांनी एकत्र येत महिला क्रिकेटच्या वाढत्या सामर्थ्याची दमदार साक्ष दिली.
थेम्सच्या साक्षीने 12 कर्णधार एकाच मंचावर
इंग्लंड आणि वेल्समध्ये 12 जूनपासून सुरू होणाऱया या महासंग्रामापूर्वी सर्व कर्णधारांची ही पहिली अधिकृत सार्वजनिक भेट ठरली. थेम्स नदीच्या पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या बिग बेन, लंडन आय आणि सेंट पॉल कॅथेड्रलसारख्या जागतिक ख्यातीच्या वास्तूंनी या सोहळ्याची भव्यता आणखी खुलवली. क्रिकेटच्या सीमारेषा मोडत महिला क्रिकेट आता जागतिक चळवळ बनत असल्याचा संदेश या कार्यक्रमातून जगभर पोहोचला.
हा ऐतिहासिक क्षण
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी या सोहळ्याचे वर्णन महिला क्रिकेटसाठी एका ऐतिहासिक टप्प्याप्रमाणे केले. ‘‘हा आतापर्यंतचा सर्वात मोठा, सर्वात महत्त्वाकांक्षी महिला टी-20 विश्वचषक ठरणार आहे. या स्पर्धेची ही भव्य सुरुवात महिला क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्वासक आहे,’’ असे त्यांनी सांगितले. क्रिकेट अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि जागतिक करण्याच्या आयसीसीच्या ध्येयाचा हा जिवंत पुरावा असल्याचेही शाह यांनी नमूद केले.
तिकीटविक्रीचा सिक्सर; दोन लाखांचा टप्पा पार
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चाहत्यांनी या विश्वचषकाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तब्बल दोन लाख तिकिटांची विक्री आधीच झाली असून महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात हा नवा विक्रम ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही महिला विश्वचषकासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आगाऊ तिकीटविक्री झाली नव्हती. त्यामुळे मैदानांमध्ये प्रेक्षकांची विक्रमी गर्दी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
सात शहरांत रंगणार महायुद्ध
12 जून रोजी बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर विश्वचषकाचा पहिला सामना खेळवला जाणार आहे, तर अंतिम लढत क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर रंगणार आहे. याशिवाय मँचेस्टर, लीड्स, साऊथम्प्टन, ब्रिस्टल आणि द ओव्हल या शहरांमध्येही सामने होणार आहेत. इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश, आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड हे 12 संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांच्या मते, वॉटरलू ब्रिजवर 12 कर्णधारांचे एकत्र क्रिकेट खेळणे ही महिला क्रिकेटच्या प्रगतीची प्रतीकात्मक आणि प्रभावी झलक होती. हा विश्वचषक महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला जाणारा आणि सर्वाधिक चर्चिला जाणारी स्पर्धा ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.































































