कारचालक महिलेने दोन चिमुरड्यांसह पाचजणांना उडवले, तीन वर्षांच्या मुलीचा जागेवरच मृत्यू

22

सामना ऑनलाईन, पुणे

बेदरकारपणे कार चालविणाऱ्या महिलेने रस्ता ओलांडणाऱ्या पाचजणांच्या अंगावर सुसाट वेगातील कार घालून त्यांना उडवले. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या धडकेत एक चिमुरडी जागीच ठार झाली तर बाकी चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास बाणेर गाव येथे झाला.

इशिका अजयकुमार विश्वकर्मा (३) असे ठार झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. तिची आई पूजा अजयकुमार विश्वकर्मा (२४), निशा शेख, शाजिद शेख (४) आणि सय्यद अली (२५, सर्व रा. धनकुडे हाइटस्, राम मंदिराजवळ, बाणेर ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुजाता श्रॉफ असे या कारचालक महिलेचे नाव आहे. तीदेखील यात जखमी झाली आहे.

पूजा विश्वकर्मा, निशा शेख या दोघी त्यांच्या मुलांना घेऊन साजिद शेख यांच्यासोबत बाणेर येथे रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या छोटय़ा दुभाजकावर त्या थांबल्या होत्या. वाहनांचा वेग जास्त असल्याने आई इशिकाला कडेवर घेऊन दुभाजकावर उभी होती. त्याच वेळी पुण्याकडून बालेवाडीच्या दिशेने जाणारी सुसाट वेगातील आय टेन ही कार दुभाजकाला धडकून उडाली आणि थेट या पाचजणांच्या अंगावर गेली. ते सर्वजण सुमारे १० ते १५ फूट रस्त्याच्या दुसऱया बाजूला जोरात फेकले गेले तर कार दुभाजकावर अडकून पडली. नागरिकांनी या सर्वांना त्वरित रुग्णालयात दाखल केले परंतु इशिकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये अपघाताचे दृश्य कैद झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाईलवर बोलल्याने अपघात
मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी ही महिला कार चालवताना फोनवर बोलत होती त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केला केला आहे, मात्र सुजाता श्रॉफने चक्कर आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण गेल्याचे तेथील लोकांना सांगितले. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर सुजाता श्रॉफने तिच्या जवळच्या लोकांना फोन करून बोलावून घेतले व त्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल झाली.

आपली प्रतिक्रिया द्या