सावधान! आरोग्य खात्याचा हाय ऍलर्ट, चायनीज ‘कोरोना’चा मुंबईत शिरकाव

1474

चीनमध्ये 25 बळी घेणाऱया ‘कोरोना’ व्हायरसचा धसका अवघ्या जगाने घेतला आहे. या जीवघेण्या ‘कोरोना’ने आता मुंबईतही शिरकाव केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून चीन-हाँगकाँगवरून आलेल्या नालासोपारा, वसईतील तीन संशयित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तीन संशयित रुग्णांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

‘कोरोना’चे संशयित रुग्ण शोधण्यासाठी देशातील मुंबई, दिल्ली, कोलकातासह सात विमानतळांवर आरोग्य चाचणी सुरू करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर चीन-हाँगकाँगहून आलेल्या 1739 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात मुंबईचे तीन तर पुण्याचे तीन जण संशयित आढळले. त्यापैकी मुंबईच्या तिघांना तातडीने महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कुठून आले हे
तीन संशयित रुग्णांपैकी एक महिला ही 22 जानेवारी रोजी चीनच्या फोशेन शहरातून आली होती. ती त्या शहरात आठवडाभर मुक्कामाला होती. त्याच दिवशी वसईतील एक जण चीनच्या गुंआगहोऊ शहरातून मुंबईत परतला होता. या दोघांनाही सर्दी-पडसे यांचा त्रास होता.

कस्तुरबात चार विशेष कक्ष
चीन-हाँगकाँगमधून आलेल्या प्रवाशांमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे आढळल्यामुळे पालिकेने चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात चार विशेष कक्ष सुरू केले आहेत. यामध्ये प्रत्येकी चार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक विशेष कक्षात डॉक्टर, एक नर्स आणि एका कर्मचाऱयाचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

रक्ताचे नमुने पुण्याला पाठवले
मुंबईत आढळलेल्या ‘कोरोना’ संशयितांच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तीन रुग्णांपैकी दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे रात्री उशिरा महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

अशी आहेत लक्षणे
‘कोरोना’ संशयितांमध्ये सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळत आहेत. शिवाय श्वासोच्छ्वास घेण्यासही त्रास जाणवतो.

– ही लक्षणे नेहमीच्या औषधोपचाराने 14 दिवसांनंतरही कमी झाली नाहीत तर कस्तुरबा रुग्णालयात औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या