माणुसकीला काळिमा! अपघातानंतर मृतदेहावरूनच गेल्या गाड्या

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील राष्ट्रीय महामार्ग २४ वर एका मृतदेहावरूनच गाड्या निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या मध्येच मृतदेह पडला होता तरीही त्याला रस्त्याच्या बाजूला उचलून ठेवण्याचे कष्ट कुणीही घेतले नाहीत. पांडव नगर येथे ही घटना घडली असून अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, १० जानेवारीच्या पहाटे चारच्या सुमाराला हा अपघात घडला. एका ३५ वर्षीय माणसाला एका गाडीने धडक बसल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. रस्त्याच्या मध्येच मृतदेह पडला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. मात्र, तोपर्यंत त्या मृतदेहावरून अनेक गाड्या गेल्या होत्या. त्यामुळे घटनास्थळापासून २०० मीटर लांबपर्यंत मृतदेहाचे अवशेष पसरले होते. धडाचा वरचा भागच वाहनांनी नष्ट केल्यामुळे या इसमाची ओळख पटू शकली नाही.

मयत इसमाच्या उजव्या हातात एक लाल धागा बांधला होता. तसंच खिशात तंबाखूची पुडी आणि तीन चार नाणीही सापडली. या माणूस तिथला वाटसरू असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या इसमाला धडक देणाऱ्या गाडीचा शोध सुरू असून त्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या