अश्लील नजरेनं महिलेकडे एकटक बघणाऱ्या उबर चालकाविरुद्ध गुन्हा, पीडितेच्या ट्विटनंतर चौकशी सुरू

दिल्लीत एका उबर ऑटो-रिक्षामध्ये चालकाने एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या घटनेच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

’02 मार्च रोजी रात्री 11.00 वाजता, भारत नगर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने NFC पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका ड्रायव्हरविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेने NFC वरून प्रवास करत असताना रिक्षा चालकाने असभ्य वर्तन तसेच घाणेरड्या नजरेनं सतत पाहात असल्याचे आरोप लावले. ही घटना मालवीय नगर 1 मार्च रोजी दुपारी 4.40 वाजता घडली’, असे दिल्ली पोलिसांच्या अधिकृत माहितीत म्हटले आहे.

पोलिसांनी आयपीसी कलम 509 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे आणि घटनेची चौकशी सुरू केली आहे.

‘त्यानुसार एफआयआर क्रमांक 98/23 अन्वये 509 आयपीसी दिनांक 2 मार्च रोजी पीएस एनएफसी येथे एक गुन्हा नोंदवण्यात आला आणि तपास हाती घेण्यात आला. वरील रिक्षा मोहम्मद युनूस खानच्या नावावर आढळून आली. A-439 नेहरू कॅम्प गोविंदपुरी दिल्ली येथे राहणाऱ्या खान यांची चौकशी सुरू असून रिक्षा चालक कोण होता त्याला पकडण्यासाठी त्याची चौकशी केली जात आहे’, असे पोलिसांच्या माहितीत सांगण्यात आले.

तत्पूर्वी, दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, दिल्लीतील एका उबर ऑटोमध्ये एका महिला पत्रकाराच्या विनयभंगाच्या घटनेबद्दल उबर इंडिया आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे.

गुरुवारी स्वाती मालीवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘दिल्लीतील एका उबर ऑटोमध्ये महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल उबर इंडिया आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उबरने कोणती पावले उचलली आहेत याचीही माहिती मागवण्यात आली आहे’.

एएनआयशी बोलताना पीडित महिलेने सांगितले की, ‘मी मालवीय नगरमध्ये माझ्या मित्राच्या ठिकाणी जात होते आणि मी एनएफसीच्या एका ऑटोमध्ये बसले. मी उबरद्वारे ऑटो बुक केला. मी ऑटोमध्ये एकटीच होते. मी गाणी ऐकत होते, सुरुवातीला मला हे काय चालले आहे ते समजले नाही. थोड्या वेळाने मला जाणवले की ऑटोचालक डाव्या बाजूच्या आरशातून माझ्याकडे एकटक पाहत होता. तो आरशातून सतत माझ्याकडे पाहत होता . त्याच्या त्या घाणेरड्या नजरेनं मी अस्वस्थ झाले आणि जागा बदलली, अवघडून बसली. तर उजव्या बाजूच्या आरशातून माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहू लागला. मी पुन्हा स्वत:ला सावरलं आणि जागा बदलली तर तो थेट मागे वळून माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला धमकावलं आणि सांगितले की मी तक्रार करेन आणि तरी त्याचं वर्तन तसंच होतं. त्यानं हरकत देखील घेतली नाही. म्हणून मी उबर अॅप उघडलं आणि अॅपवरील एका नंबरवर क्लिक केले. मात्र, नेटवर्क मिळत नसल्यानं संपर्क होऊ शकला नाही म्हणून मी पुन्हा एकदा त्या नंबरवर कॉल केला. यावेळीही ऍपवरील विविध त्रुटींमुळे मला कंपनीशी संपर्क साधता आला नाही’, असे पीडित महिलेने सांगितले.

महिलेने पुढे सांगितले की तिने या घटनेबद्दल ट्विट केल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने कारवाई केली.

ती म्हणाली, ‘मी रात्री या घटनेबद्दल ट्विट केले. माझे ट्विट व्हायरल झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने पाठपुरावा केला. मी आयोगाकडे तोंडी तसेच लेखी तक्रार नोंदवली. या सर्व प्रकारानंतर मी पोलीस तक्रार नोंदवण्यासाठी आले होते’.

‘दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की ते एफआयआर दाखल करतील आणि मला उद्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची गरज आहे’, असेही त्या महिला पत्रकारानं पुढे सांगितलं.

‘माझ्यासोबत ही घटना दिवसाढवळ्या घडली. दिवस असल्यानं सामना करण्याचा पर्याय माझ्याकडे होता. घटना रात्री घडली तर काय? उबर अॅप काम करत नाही. योग्य यंत्रणा असावी आणि त्यांनी मला परत बोलावायला हवे होते. मी या घटनेविरोधात आवाज उठवला तेव्हा कंपनीने माझ्याशी संपर्क साधला’.