कर्मचाऱ्यांचा पीएफ हडपणाऱ्यांना दणका, एज्युकेशन ट्रस्टच्या तिघांवर गुन्हा

सामना ऑनलाईन । ठाणे 

कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापून ते त्यांच्या खात्यात जमा न करता परस्पर हडपणाऱया कंपन्या, अस्थापना व संस्थांना दणका देण्यास भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सुरुवात केली आहे. त्यानुसार घोडबंदर येथील मेसर्स काशी एज्युकेशन ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांचा पीएफ हडपणाऱया तिघांवर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे.

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या हाती काही रक्कम पडावी व त्यांना पेन्शन मिळावी याची तरतूद म्हणून त्याच्या पगारातून विशिष्ट रक्कम दर महिन्याला कापली जाते. कंपनीही आपला हिस्सा मिळवून ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कर्मचाऱयाच्या खात्यामध्ये जमा करते. मात्र अनेक कंपन्या केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापत असून ती रक्कम त्याच्या खात्यात जमा करत नसल्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार घोडबंदर येथील मेसर्स काशी एज्युकेशन ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या पगारातून आरोपी हरिश्चंद्र पांडे, कृपाशंकर मिश्रा आणि विजयालक्ष्मी पांडे यांनी ३९ हजार ६३५ रुपये कापले. मात्र ही रक्कम आणि मालकाचा ४३ हजारांचा हिस्सा असे एकूण ८३ हजार ४२० रुपये पीएफ कार्यालयात जमा केले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.