जळगाव: रुग्णालयाचा हलगर्जीपणा, मुलीला कायमचे अपंगत्व आल्याने गुन्हा दाखल

भरत काळे । जळगाव

जळगाव येथील मल्टी स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती हॉस्पिटलविरुद्ध उपचारात हलगर्जीपणा करत मुलीला कायमचे अपंगत्व आल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बड्या हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अनिल तायडे यांची मुलगी ममता तायडे हिचा२९ जुलै २०१५ला अपघात झाल्यामुळे गणपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी पायाला दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र २९ जुलै ते ३१ जुलै २०१५दरम्यान ममताच्या पायावर योग्य उपचार करण्यात आले नाही. ३ दिवसानंतर गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अनिल तायडे यांना पायाची हालत गंभीर आहे, पुढील उपचार होऊ शकत नाही असे म्हणत मुलीचा डिस्चार्ज घेण्यास सांगितले.

त्यानंतर तायडे यांनी मुलीला नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र नाशिक गेल्यावर तेथे पायावर ५ शस्त्रक्रिया झाल्या. अजून २ शस्त्रक्रिया बाकी आहेत. सदरच्या पायाला कायम स्वरूपी अपंगत्व आले आहे. गणपतीच्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा मुलीच्या अपंगत्व येण्यास कारणीभूत असल्याने तायडे यांनी गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना ही बाब सांगितली मात्र तायडे यांना कोणीही दाद दिली नाही. २ वर्षानंतर तायडे यांनी सर्व कागदपत्रे शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यात गणपती हॉस्पिटलमध्ये उपचारात हलगर्जीपणा झाल्याच्या ठपका ठेवण्यात आला. यावरून गणपती हॉस्पिटलच्या डॉ. शीतल ओस्वाल, डॉ.अजय कोगटा, डॉ.लीना पाटील, विशाल पिंपरिया आणि डॉ. अमित हिवरकर यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात कलम ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती हॉस्पिटलमध्ये मुलीवर उपचार करतांना हलगर्जीपणा झाला होता. परंतु आपण सामान्य माणूस असल्यामुळे हॉस्पिटलच्या बड्या म्हणवणाऱ्या प्रशासनाने माझे म्हणणे लक्षात घेतले नाही. शेवटी कागदपत्रांच्या आधारे मी हॉस्पिटलचे पितळ उघडे पाडले आहे. गरीब रुग्णांवर यापुढे असा अन्याय होणार नाही अशी अपेक्षा बाळगतोस, अशा भावना अनिल तायडे (मुलीचे वडील) यांनी व्यक्त केल्या आहेत.