
अहमदपूर येथील डॉ. किनगावकर यांच्या विरोधात अवैध गर्भपात केल्याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर तालुका समुचित प्राधिकारी यांना तपासणी नंतर अवैध गर्भपात केल्याची नोंद आढळून आली आणि त्यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली अधिकृत माहिती अशी की, तक्रारदार वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय कालीदास बिराजदार हे अहमदपूर तालुका समुचित प्राधिकारी असल्यामुळे दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. किनगावकर यांच्या हॉस्पिटल एमटीपी सेंटरला भेट दिली. तेथे त्यांना अवैध गर्भपात केले असल्याची नोंदी आढळून आली. यानंतर त्यांनी सिव्हील सर्जन लातूर यांना तसा अहवाल सादर केला. त्यामुळे सिव्हील सर्जनने एक तपासणी पथक तयार करून पुन्हा किनगावकर हॉस्पिटलची तपासणी केली. सदर तपासणीअंती त्यांना तेथे 2014 ते 2022 च्या दरम्यान शासनाने घालून दिलेल्या नियमांचे वैद्यकीय गर्भपात एमटीपी कायद्याचे उल्लंघन करून, बेकायदेशीररित्या गर्भपात केले असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन डॉ.किनगावकर यांच्याविरुध्द अहमदपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं.545/2022 कलम 3(2)(अ)(ब) वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड हे करत आहेत.