पत्रकार वारिशे यांच्या अपघाताचे गूढ वाढले, पंढरीनाथ आंबेरकरवर खुनाचा गुन्हा दाखल

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले महिंद्रा थारचे चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादंवि कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी या अपघातप्रकरणी आंबेरकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर येथील न्यायालयाने आंबेरकर याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्या अपघाताबाबतचे गूढ वाढत असतानाच राजापूर पोलिसांनी आंबेरकरवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी दुपारी हा अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारीशे गंभीर जखमी झाले होते आणि कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते.

त्या अपघातानंतर मृत्युमुखी पडलेले पत्रकार शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद नागले यांनी राजापूर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलिसांनी थार गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याने आंबेरकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता.

पत्रकार संघटनांकडून निषेध

वारीशे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाबरोबरच महाराष्ट्र पत्रकार परिषद, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि प्रेस क्लब मुंबई यांनी करत घटनेचा निषेध केला आहे. वारीशे यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तभावरील हल्ला आहे. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घ्यावी अशीही मागणी केली आहे.