स्वप्नील चव्हाणच्या मालकीचे गजानन फर्टीलायर्झसविरुध्द गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । नांदेड

सन 2010 या वर्षातील शिल्लक असलेल्या मालामधील खुल्या बॅगांमध्ये बेकायदेशीररित्या दोन प्रकारचे मिश्र खत टाकून शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यास मिळताच त्यांनी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या स्वप्नील चव्हाणच्या मालकीचे गजानन फर्टीलायझर्सची तपासणी करून फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी भागात असणाऱ्या स्वप्नील चव्हाण यांच्या गजानन फर्टीलायझर्स या कारखान्यातून शेती उपयोगासाठी विविध प्रकारचे रासायनिक खत तयार केले जातात. यामध्ये 18:18:10 व 20:20:00 या दोन प्रकारच्या खतामध्ये बेकायदेशीर जुने खत मिक्स करून शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची लुट करण्याचा घाट गजानन फर्टीलायझर्सने आखला होता. सन 2010 च्या लॉटमधील शिल्लक असणाऱ्या बॅगांमध्ये हे खत भरून विकण्यासाठी तयार करण्यात येत होते यामध्ये 18:18:10 मध्ये 1144 मेट्रीक टन तर 20:20:00 हे 2206 मेट्रीक टन एकूण 3350 मेट्रीक टन खत बेकायदेशीर रित्या तयार करून खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिला जात होता. शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्याचा घाट गजानन फर्टीलायझर्सने आखला होता याची माहिती नांदेड कृषी अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी एमआयडीसी येथील गजानन फर्टीलायझर्स येथे जाऊन पाहणी केली असता त्यांना जुन्या मालाच्या बॅगांमध्ये हे खत बेकायदेशीररित्या तयार करून विक्रीस उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी पंचनामा करून गजानन फर्टीलायझर्सविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सोनवणे हे करीत आहेत.

हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची भिस्त आपल्या जमीनीतून येणाऱ्या उत्पानाकडे असते. त्या उत्पनात शेतकऱ्यांची मेहनत, निसर्गाची साथ आणि पिकांसासाठी वापरली जाणारी खते याचा मोठा हातभार असतो. शेतकरी मेहनत करेल, निसर्ग साथ देईल पण खतच बोगस असेल तर ते उत्पन्न वाढणार कसे. उत्पन्न वाढले नाही तर देशातील जनतेला अन्न मिळणार कसे आणि आपल्या देशातील नागरीकांना अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत होणारी ही फसवणूक अत्यंत गंभीर आहे. या तपासणीत आज गजानन फर्ल्टीझर्सविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला पण त्यात निष्कर्ष काय येतील हे पोलीसांच्या तपास प्रक्रियेवर आणि फौजदारी प्रक्रिया संहितेने पोलीसांना दिलेल्या तपासाच्या अधिकारांचा वापर पोलीस कसे करतील त्यावर अवलंबून आहे.

आज खतांच्या बाजारपेठेत मिश्र खताचा सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत ते खत पोहचेल तेंव्हा त्याचा प्रति मेट्रीक टन दर 18 हजार रुपये आहे. 3350 मेट्रीक टन खत कृषी अधिकाऱ्याने आज पकडले आहे. त्याची बेरीज 18 हजार सोबत केली तर त्याचा आकडा 5 कोटी 36 लाख रुपये होता. ही माहिती आज खताच्या बाजारात काम करणाऱ्या विक्री विभागातील व्यक्तीने दिली आहे.