
शेतकऱयांच्या नावे कर्ज काढून सुमारे सव्वासात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील कंचेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगिनाथ सिद्राम मेटकरी, गणपत अण्णा मोरडे, पंडित चन्नप्पा मिटकरे (रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) अशी फसवणूक झालेल्या शेतकऱयांची नावे आहेत.
योगिनाथ मेटकरी, गणपत मोरडे, पंडित मिटकरे हे तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे असलेल्या कंचेश्वर साखर कारखान्याला सन 2015 पासून ऊस घालतात. या शेतकऱयांकडून कारखान्याने कागदपत्रे घेतली होती. या कागदपत्रांचा गैरवापर करत साखर कारखान्याने बनावट सह्यांद्वारे सोलापुरातील लष्कर येथे असलेल्या युनियन बँकेच्या शाखेतून योगिनाथ मेटकरींच्या नावे 1 लाख 65 हजार 600, गणपत मोरडेंच्या नावे 2 लाख 58 हजार व पंडित मिटकरे यांच्या नावे 3 लाख रुपये कर्जप्रकरण करून परस्पर काढले आहेत. ही घटना नुकतीच उघडकीस आल्याने या तिघा शेतकऱयांनी सदरबझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फसवणूकप्रकरणी कारखान्याचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.