
आयपीएल क्रिकेटवर मोबाईलवरून ऑनलाईन सट्टा लावणार्यावर अहमदपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक 24/05/2023 संध्याकाळी छापा मारून 5 लाख 68 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह 6 व्यक्तींना जेरबंद करण्यात आले आहे. तर यातील 3 व्यक्ती फरार झाल्या आहेत. अहमदपूर व चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी ही कारवाई केली आहे.
अहमदपूर शहरामध्ये काही व्यक्ती मोबाईल फोनवर ऑनलाईन आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावून सट्टा खेळत आणि खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी त्यांच्या पथकातील तसेच अहमदपूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमलदारांचे वेगवेगळी तीन पथके नेमून मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यावरून पथकातल्या पोलिसांनी अहमदपूर शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी एकाच वेळी छापा मारला. तेव्हा काही इसम मोबाईल फोनवर काही तरी खेळताना आणि वहीमध्ये आकडेमोड करताना मिळून आले.
राधाकिशन उर्फ बाळू बालाजी वरंगलवाड (वय 32 वर्ष) रा. शिरूर ताजबंद ता. अहमदपूर, अंतेश्वर पांडुरंग भताने (वय 20 वर्ष) रा. भतानेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड, नवनाथ वैजनाथ फड रा. धर्मापुरी ता. अंबाजोगाई जि. बीड (फरार), सुंदरलाल कलु राऊतरे (वय 35 वर्ष) रा. गवळी गल्ली अहमदपूर, शुभम कळू राऊतरे (वय 24 वर्ष) रा. गवळी गल्ली अहमदपूर, लखन यादव रा. गंगाखेड जि. परभणी (फरार), धरम भीम लाल काबलिया (वय 25 वर्ष) रा. गवळी गल्ली अहमदपूर, नीलकांत गोपाल काबलिया (वय 34 वर्ष) रा. महात्मा फुले विद्यालय रोडच्या बाजूला अहमदपूर, बाळू राजे रा. चौढा नगर अहमदपूर (फरार).
या इसमांच्या मोबाईलची पहाणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावून खेळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. ताब्यातील इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत क्रिकेट सट्ट्याचे साहित्य, विविध कंपन्याचे अनेक मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 5 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, नमूद आरोपी विरुध्द अहमदपूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 309/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ), अहमदपूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 310/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5. अहमदपूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 311/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 प्रमाणे असे तीन गुन्हे दाखल करून नमूद 6 आरोपी ताब्यात असून 3 आरोपी फरार आहेत. पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाही अहमदपूर पोलीस स्टेशन करीत आहेत. सदरची कारवाई उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच अहमदपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बंकवाड व पोलीस अंमलदारांनी केली आहे.