लग्नाचा आहेर शहिदांच्या कुटूंबासाठी

21

राजेश देशमाने । बुलढाणा

कश्मिर मधील पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रायपूर येथील विभुते कुटूंबाकडून लग्नात आलेला वर-वधूकडील नगदी आहेर शहिदांच्या कुटूंबासाठी दिला आहे.

काश्मिर मधील पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशासह बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक लोकांनी आपआपल्या परीने हातभार लावत आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील औषध विक्रेते राजेश्वर भिमाशंकर विभुते यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहेर मदत म्हणून देण्याचा निर्णय विवाहस्थळी लावलेल्या फलकातून जाहीर केला. या आहेरात वर-वधू दोन्हींच्या नातेवाईंकानीही भरभरुन नगदी आहेर केला आहे. आहेरांची मोजदाद केल्यानंतर त्यांनी स्वत:कडील काही रक्कम टाकून जवळपास एक लाख रुपये देणार असल्याचे वधूच्या वडिलांनी सामनाशी बोलताना सांगितले.

वर-वधू उच्च विद्याविभुषीत आहे. वराचे नाव आशुतोष दत्तास्वामी सुब्रमकर आहे. वधूचे नाव आरती राजेश्वर विभुते असे आहे. वराचे वडील पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त आहे. वधूकडील ५ भावांचे कुटूंब एकत्र असून कुटूंबात जवळपास ५० लोक आहे. हा विवाह चिखली येथे आशिर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाला. वर-वधू दोघांकडील आहेराची रक्कम शहिदांच्या कुटूंबाला देण्यात येणार आहे असा विवाह स्थळी फलक लावण्यात आला होता. या निर्णयामुळे वर-वधूंच्या कुटूंबाचे परिसरात कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या