गार्डला भजीपाव आणायला पाठवून चालक कॅश व्हॅन घेऊन पळाला

1112

गार्डला भजीपाव आणायला पाठवून 72 लाख रोख रुपये असलेली कॅश व्हॅन घेऊन पळालेल्या चालकाला बांगूर नगर पोलिसांनी काही तासांतच बेडय़ा ठोकल्या. शेरअली असे त्या चालकाचे नाव आहे. गुरुवारी शेरअलीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सिस्को कंपनी ही हॉटेल, मॉल्समध्ये रोज जमा होणारी रक्कम गोळा करून ती बँकेत भरतात. आज सकाळी शेरअली, कस्टडीयन राहुल खरे आणि गार्ड हे मालाड लिंक रोड परिसरातील कॅश जमा करत होते. दुपारी पावणेएकच्या सुमारास मालाडच्या लिंक रोड येथील एका दुकानात राहुल हा पैसे आण्यासाठी गेला होता. तेव्हा शेरअलीने भूक लागली असल्याचे सांगून गार्डला भजीपाव आण्यासाठी सांगितले. गार्डने भजीपाव आणण्यास नकार दिला, पण शेरअलीने सतत तगादा लावल्यामुळे गार्ड भजीपाव आणण्यासाठी गेला.

गार्ड भजीपाव आणण्यासाठी गेला असता शेरअली हा कॅश व्हॅन घेऊन पळाला. भजीपाव घेऊन आलेला गार्ड हा दुकानाजवळ आला असता तेथे कॅश व्हॅन नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने शेरअलीला फोन केला. मात्र शेरअली हा फोन उचलत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने गार्डने याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडल्या प्रकाराची माहिती कळवली. ही माहिती समजताच बांगूरनगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी तपास करून शेरअलीला कांदिवली परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडून काही रक्कम हस्तगत केली. रात्री उशिरा शेरअलीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली.

रिक्षातून नेली कॅश

शेरअली हा चार वर्षांपासून कंपनीमध्ये कामाला आहे. तो गाडीत जमा होणारी रक्कम पाहून नेहमी चिंतेत असायचा. आज दुपारी शेरअली कॅश व्हॅन घेऊन दहिसर चेकनाका परिसरात गेला. कॅश व्हॅन तेथेच ठेवून तो काही रक्कम घेऊन रिक्षाने कांदिवली येथे मुलीच्या घरी गेला होता.

कॅश व्हॅन लुटीच्या

यापूर्वीच्या मुंबईतील घटना

  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहिसर येथे शस्त्राचा धाक दाखवून कॅश व्हॅन लुटीची घटना घडली होती.
  • मार्च 2017 मध्ये धारावीत कॅश व्हॅनमधील दीड कोटी रक्कम घेऊन चालक पळाला होता.
  • नोव्हेंबर 2016 मध्ये वांद्रे येथे कॅश व्हॅनमधील गार्डला चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न झाला होता.
  • 28 जानेवारी 2015 ला विलेपार्ले येथे 1 कोटी 95 लाखांच्या चोरीप्रकरणी चार आरोपींना गुन्हे शाखेने केले होते गजाआड.
  • 2015 लोअर परळ येथेही एटीएम व्हॅनच्या चालकाला गुंगीचे औषध देऊन 80 लाख रुपये चोरीचा प्रयत्न.
आपली प्रतिक्रिया द्या