उपायुक्त हरीश बैजल यांचा आकसाने ‘एसीआर’ लिहिला

28

सामना प्रतिनिधी । मुंबई

पूर्वग्रह व डूख ठेवून एका पोलीस उपायुक्तावर गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरे लिहिल्याबद्दल व त्याची सेवाज्येष्ठता डावलल्याबद्दल केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) पोलीस महासंचालक दर्जाच्या संबंधित आयपीएस अधिकाऱयांना नुकतीच दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सतीश माथुर हे मुंबई वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त असताना त्यांनी वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस आयुक्त हरीश मगनलाल बैजल यांच्या गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरे लिहिले होते. या शेऱयांविषयी बैजल यांना कळविणे सक्तीचे होते, परंतु बैजल यांना न कळविल्यामुळे त्यांना आपली बाजू मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे यूपीएससीच्या कमिटीने ‘आयपीएस’ नॉमिनेशनसाठी बैजल यांच्या नावाचा विचार केला नाही. बैजल यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या 70 पोलीस उपायुक्तांना आयपीएस नॉमिनेशन दिले.

या अन्यायाविरुद्ध बैजल यांनी ‘कॅट’मध्ये धाव घेतली व डीजीपी दर्जाच्या आयपीएस अधिकाऱयांनी सूडबुद्धीने आपल्यावर कसा अन्याय केला याची पुराव्यानिशी ‘कॅट’कडे वाच्यता केल्यावर बैजल यांची सेवाज्येष्ठता डावलल्याबद्दल संबंधित अधिकाऱयांना दरवर्षी २ हजारांचा (५ वर्षांपर्यंत) दंड ठोठावला. तसेच न्यायालयात अर्ज करण्यासाठी काही वकिलांची फी, कागदपत्रे आदींसाठी खर्च झाला आहे तो बैजल यांना देण्यात यावा असेही ‘कॅट’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. डीजीपी सतीश माथुर, माजी डीजीपी अनामी रॉय तसेच आएएस अधिकारी अमिताभ राजन आदी अधिकाऱयांनी बैजल यांना आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्यामुळे त्यांची सेवाज्येष्ठता रखडली व आयपीएस नॉमिनेशन मिळायलाही वेळ लागला असे सांगण्यात येते.

बैजल यांच्यावर का व कसा अन्याय झाला याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती नेमावी असेही ‘कॅट’ने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या