
अधिक मासनिमित्त सासूरवाडीत सध्या जावयाचे कोण कोडकौतुक चालू आहे. रांगोळ्यापासून पायघड्यांपर्यंत, पुरणपोळीपासून आमरसापर्यंत… जावयाच्या खुशीपुढे सोन्याची काय किंमत! सोन्याची अंगठी मिळणार म्हणून खुश असलेल्या एका जावईबापूच्या आनंदावर मांजराने ‘धोंडा’ घातला! सासूबाईंनी सोन्याची अंगठी लपवलेला घोंडाच मांजराने खाल्ला! अंगठी बाहेर काढण्यासाठी सासूरवाडीच्या लोकांनी नाना उपाय केले, पण मांजराने काही तो ‘धोंडा’ बाहेर काढला नाही! शेवटी मांजराचे प्राण गेल्यावरच ती अंगठी जावईबापूंना मिळाली! सध्या सगळीकडे अधिक मासनिमित्त लेक-जावयाचे कोडकौतुक चालू आहे. टाकरवणपासून जवळच असलेल्या एका छोट्याशा गावामध्येही जावईबापू सासूरवाडीला खास धोंडेजेवणासाठी आले होते. जावईबापूंच्या सरबराईमध्ये सगळी सासूरवाडी व्यस्त होती. पुरणपोळी, कटाची आमटी, कुरडया, पापड्या, भजे असा सगळा साग्रसंगीत बेत तयार होत होता. जावईबापूंसाठी खास आहेर आणि त्यावर सोन्याची अंगठीही तयार होती. सासूबाईंनी अंगठी एका धोंड्यात टाकली. पाटरांगोळी झाली, जावईबापू जेवायला बसले.
मांजरीने डाव साधला
घरात स्वयंपाक चालू असताना मांजर टपूनच बसले होते. जावईबापू जेवायला बसल्यामुळे पंगतीला वाढण्यासाठी लगबग सुरू झाली आणि तेवढ्यात मांजराने डाव साधला आणि नेमका अंगठी घातलेला धोंडाच खाऊन पसार झाले. मांजराने धोंडा खाल्ल्याचे सासूबाईंनी पाहिले. त्यांचा जीव घाबरा झाला. पण जावईबापू जेवायला बसल्यामुळे त्यांना काही बोलता येईना. शेवटी पंगत उरकून घेण्यात आली. त्यानंतर सासूबाईंनी झाला प्रकार पुरूष मंडळींच्या कानावर घातला.
नशिबी ‘धोंडा’ पडला!
सोन्याची अंगठी असलेला धोंडा खाऊन पसार झालेल्या मांजराला पकडून बांधून ठेवण्यात आले. जावईबापूंना काय झाले हे कळलेच नाही. अखेर मांजराने डोक्यावर ‘धोंडा’ टाकल्याचे कळल्यानंतर जावईबापू हिरमुसले. परंतु सोन्याची अंगठी देण्याचा शब्द देऊन आहेर करून लेक-जावयाची बोळवण करण्यात आली.
अंगठी काढण्यासाठी नाना उपाय
मांजराच्या पोटात असलेली अंगठी काढण्यासाठी काय करावे या विचाराने सर्वच चिंतेत – पडले. चार दिवस मांजर एका जागेवर बांधून ठेवण्यात आले. दररोज मांजराची ‘शिसू’ बघण्यात – आली. परंतु मांजराने काही ताकास तूर लागू दिली नाही. मांजराला व्हेटर्नरी डॉक्टरकडे नेण्याचा – निर्णय घेण्यात आला. डॉक्टराने मांजराला उलटी तसेच जुलाबाचे औषध दिले. परंतु तरीही अंगठी – काही बाहेर आली नाही. चार दिवसांच्या उलट्या, जुलाबांनी मांजर खंगून गेले आणि त्याने प्राण सोडला. त्यानंतर पुन्हा मांजराचे कलेवर डॉक्टराने नेण्यात आले. ऑपरेशन करून मांजराच्या पोटातील अंगठी बाहेर काढण्यात आली.
































































