रशियातील संग्रहालयाची सुरक्षा मनीमाऊंच्या खांद्यावर

45

सामना ऑनलाईन। सेंट पीटर्सबर्ग

मोठमोठी संग्रहालयं सांभाळणं, त्यांची देखरेख करणं हे काही येऱ्यागबाळ्याचं काम नाही. तर त्यासाठी लागतात त्या प्रशिक्षित व्यक्ती. उंचपुऱ्या, धिप्पाड देहयष्टीच्या, भेदक नजरेच्या. ज्यांनी एखाद्याकडे नुसत जरी पाहिलं तरी समोरच्या व्यक्तीच्या काळजात धडकी भरावी. हे सर्वसाधारणपणे आपण सगळीकडे ऐकतो आणि पाहतो. पण रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील हेरिमिटेज संग्रहालयाच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र तब्बल ७० मनीमाऊंच्या खांद्यावर आहे. काळ्या, पांढऱ्या, करड्या, तपकिरी रंगाच्या, काळ्या, पिवळ्या, हिरव्या डोळ्यांच्या या मांजरी १७६४ पासून पिढ्यानपिढ्या या संग्रहालयाचं संरक्षण करत आहेत.

रशियातल हेरिमिटेज संग्रहालय हे पर्यटकांच मुख्य आकर्षणाच ठिकाण. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. पण संग्रहालयातील प्राचीन वस्तू न्याहाळण्यापेक्षा या पर्यटकांचे डोळे शोधत असतात त्या येथील ‘अँटिक’ मांजरी. गंमत म्हणजे जेव्हा पर्यटकांची संग्रहालयात येण्याची वेळ होते. तेव्हा या मांजरी एकापाठोपाठ एक अशी रांग लावून शिस्तीत बेसमेंटमध्ये जातात. पण तेथून त्या या पर्यटकांवर आणि त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून असतात. एखाद्याचं वागणं यांना खटकलं की त्या लगेच सांकेतिक भाषेत इतरांना सिग्नल देतात. मग एक बेल वाजवून अधिकाऱ्यांना सूचना करतात.

या मांजरींच्या कुतुहलापोटी अनेक जण त्यांना बघण्याचा, भेटण्याचा प्रयत्नही करतात. पण त्या सहजासहजी कोणाच्याही हातात येत नाहीत. यांना खास सुरक्षेचे प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. त्यांच्यातही हुशार, अतिहुशार, मध्यम हुशार अशी मांजरांचे वेगवेगळे गट बनवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संग्रहालयाच्या पायऱ्या चढून उतरून मनीमाऊंचे पाय दुखतात म्हणून त्यांना मसाजही देण्यात येतो. एवढेच नाही तर त्यांना ही आठवड्याची सुट्टी असते. दरवर्षी २८ मार्चला या मांजरांसाठी स्पेशल पार्टीचं आयोजन करण्यात येतं.

सुरुवातीला संग्रहालयातील उंदरांना घालवण्यासाठी या मांजरांचा उपयोग व्हायचा. पण आता त्या माणसांवर लक्ष ठेवत असतात. यामुळे संग्रहालयातील कर्मचारी या मांजरींपासून चार हात लांब राहणेच पसंत करतात.

आपली प्रतिक्रिया द्या