गोवंश हत्येविरोधात आंदोलन, आंदोलकांवरील लाठीमाराची चौकशी करणार!

359
फोटो- प्रातिनिधीक

रत्नागिरी जिह्यात गोवंश हत्येविरोधात आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, त्याचप्रमाणे ज्यांच्यावर अनावश्यक गुन्हे दाखल करण्यात आले त्यांचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली. यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी हा लाठीमार नाहक झाला की नाही याची चौकशी करण्यात येईल. त्यानुसार गुन्हे दाखल झालेल्यांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.

भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हय़ातील चिपळूण येथे गोवंश हत्या झाल्या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती. 26 जानेवारी 2019 रोजी पहिली घटना घडल्याचे सांगून जाधव म्हणाले, या नृशंस प्रकरणाविरोधात सर्वपक्षीय नेते, जनता यांनी तक्रार करूनही पोलीस अधीक्षकांनी भेट दिली नाही. पोलिसांनी लाठीमार केला. शंभर-सवाशे लोकांना आरोपी केले. आता देखील हायवे क्रमांक 66 च्या लगतच अशा गोवेश हत्या होत आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात देखील असे एक ठिकाण मला माहिती असल्याचे जाधव म्हणाले. रेती, जांभा दगडाची वाहतूक करणारा एकही ट्रक पोलिसांच्या नजरेतून चुकत नाही. मग या मांसाची वाहतूक करणारे वाहन कसे नजरेतून सुटते असा सवालही जाधक यांनी केला. त्यावर रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्यातील पिंपतळी खुर्द, पायरवणे येथे गोवंश हत्या झाल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींना शोधण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

तपासणी अहवालाचा कालावधी निश्चित करणार
संजय केळकर यांनी अशा मांसाची प्रयोगशाळेत तपासणी होण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला जातो. त्यासाठी कालावधी निश्चित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर ज्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगूनही घटनास्थळी भेट दिली नाही त्यांची चौकशी केली जाईल. रत्नागिरी येथील संबंधित ठिकाणाची माहिती भास्कर जाधव यांनी द्यावी. तिथेही असे प्रकार घडतात काय याची माहिती घेण्यात येईल व मांस तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांना अहवाल देण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येईल असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या