भाजपच्या नगरसेवकावर खंडणी मागितल्याचा आरोप; सीबीआयने केली अटक

अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरला धमकावून त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली सीबीआयने त्यांना अटक केली आहे. ही घटना नवी दिल्लीतील वसंतकुंज भागातील आहे. बिल्डरकडे खंडणी मागितल्याचा आरोपाखाली नवी दिल्लीतील वसंतकुंजमधील भाजपचे नगरसेवक मनोज महलावत यांना सीबीआयने अटक केली आहे.

वसंतकुंज परिसरात एक बिल्डर अवैध बांधकाम करत होता. नगरसेवक मनोज यांनी त्याच्याकडे 10 लखांची खंडणी मागितली होती. हे पैसे आपण थेट नगरसेवकालाच देऊ, असे बिल्डरने सांगितले. त्यानंतर बिल्डरने याबाबत सीबीआयकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर खंडणीची रक्कम स्वीकरताना नगरसेवक मनोज यांना रंगेहात पकडले आणि सीबीआयने त्यांना अटक केली.

नगरसेवक मनोज महलावत यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मनोज महलावत 2017 मध्ये भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

सीबीआयने भ्रष्टाचारविरोधातील कारवाईला गती दिली आहे. भ्रष्टाचाराने आरोप असणाऱ्या काही सरकारी अधिकाऱ्यांची सीबीआयने चौकशी केली आहे. तर काही अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आता खंडणीप्रकरणी भाजपच्या नगरसेवकालाच अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या