ममतांना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल यांना सीबीआयने केली अटक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गुरुवारी आणखी एक धक्का बसला. तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल (Anubrata Mondal) यांना सीबीआयने अटक केली आहे. गोवंश तस्करीप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे.

सीबीआयने याआधी त्यांना चौकशीसाठी दहा वेळा समन्स धाडले होते. परंतु ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. यानंतर सीबीआनयने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि अटकेची परवानगी मागितली. त्यानंतर आज सकाळी अनुब्रत मंडल यांना अटक करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी सीबीआयने अनुब्रत मंडल यांना समन्स पाठवले होते. अनुब्रत मंडल हे तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष असून पक्षातील बडे नेते आहेत. बुधवारी निजाम पॅलेस येथील सीबीआयच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु तब्येतीचा हवाला देत ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. तत्पूर्वी सोमवारी देखील त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले होते. त्या दिवशीही ते हजर राहिले नाहीत.

अनुब्रत यांच्या वकिलांनी माहिती देताना सांगितले की, सीबीआयला मेल करून तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यांना कोलकाता येथे एसएसकेएममध्ये चेकअपसाठी जायचे होते. तर दुसरीकडे अनुब्रत यांच्यावर इलाज करणाऱ्या मेडिकल बोर्डने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्ट चटर्जी यांच्यावर याआधीच ईडीने धाड टाकली होती आणि त्यांना अटक केली होती. तसेच पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्यावरही ईडीने कारवाई करत कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केले होती. तसेच तृणमूलचे मंत्री मोलॉय घटक, परेश अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य हे देखील ईडीच्या रडारवर आहेत.