दाभोलकर हत्याकांडाचा खटला अंतिम टप्प्यात – सीबीआयचा हायकोर्टात दावा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा खटला अंतिम टप्प्यात आहे. खटल्याच्या सुनावणीला गती मिळाल्यास पुढील दोन-तीन महिन्यांत ही सुनावणी पूर्ण होऊ शकेल, असा दावा सीबीआयने मंगळवारी उच्च न्यायालयात केला.

हत्याकांडातील मुख्य आरोपी वीरेंद्रसिंह तावडेने खटल्याच्या रखडपट्टीकडे लक्ष वेधत जामिनासाठी अर्ज केला आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाने 2020 मध्ये तावडेचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाला आव्हान देत तावडेच्या वतीने अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अपील दाखल केले आहे. याप्रकरणी मंगळवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तावडे हा मागील 7 वर्षांपासून तुरुंगात आहे. हत्याकांडाच्या खटल्यात पेंद्रीय तपास यंत्रणेने सुरुवातीला साक्षीदारांची जी यादी सादर केली होती, त्यात आणखी साक्षीदारांची नावे जोडली गेली. त्यामुळे खटल्याची रखडपट्टी झाली आहे, असे म्हणणे अॅड. इचलकरंजीकर यांनी मांडले.  त्यावर तावडेचा दावा खोडून काढत सीबीआयतर्फे अॅड. संदेश पाटील यांनी बाजू मांडली. या प्रकरणात एकूण 32 साक्षीदारांपैकी केवळ 8 साक्षीदारांची साक्ष तपासणी बाकी असून त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही,  असे पाटील म्हणाले.