आता सीबीआयचा राष्ट्रीय क्रीडा संघटनांवर ‘वॉच’

222

हिंदुस्थानातील राष्ट्रीय क्रीडा संघटनांवर आता सीबीआयची करडी नजर असणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त संघटनांना येत्या 17 जानेवारीपर्यंत आपला तपशील देण्याचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले आहेत. अशी माहिती स्पेशल क्राइम ब्रँचचे मुख्य जगरूप गुसिन्हा यांनी याप्रसंगी दिली.

क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, कबड्डी यांसारख्या खेळांच्या लीगसाठीच्या लिलावाद्वारे खेळाडूंवर कोटय़वधी रुपयांची उधळण करण्यात येते. आर्थिक गुंतवणूक वाढल्यामुळे भ्रष्टाचारही वाढू लागलाय. अनधिकृत बेटिंगलाही आळा बसवण्यात अपयश आले आहे. लढत फिक्सिंग करण्याचे प्रमाणही वाढत आहे. या सर्व कारणांमुळे सीबीआयने कठोर पाऊल उचलले आहे.
राष्ट्रीय क्रीडा संघटनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सीबीआयकडून एका स्पेशल क्रीडा विभागाची स्थापना करण्यात आली आहे. हा विभाग आता क्रीडा संघटना व त्यांच्याशी संलग्न असलेल्या सदस्यांची कसून तपासणी करणार आहे. त्यानंतर कोणती संघटना अडचणीत येतेय आणि त्यावर सीबीआयकडून कोणती कारवाई करण्यात येतेय हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

क्रीडा संघटनांना द्यावी लागणारी माहिती

  • संघटनेचे नाव
  • रजिस्टर नंबर
  • आंतरराष्ट्रीय किंवा हिंदुस्थान ऑलिम्पिकशी संलग्न आहे का?
  • संघटनेतील अधिकाऱ्यांचा सर्व तपशील
  • संलग्न सदस्यांबद्दल सर्व तपशील
  • राबवण्यात येणारे उपक्रम
  • स्पर्धांबद्दल तपशील
  • सर्वोत्तम कामगिरीचा तपशील
  • अडथळ्यांचा तपशील
आपली प्रतिक्रिया द्या