‘…तर दिल्लीचं तख्त हलवून सोडू’, लालू यादव यांच्या CBI चौकशीने संतापलेल्या मुलीचा इशारा

lalu-yadav-rohini-acharya

देशात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधीपक्षांनी नुकतेच पत्र दिले. विरोधकांनाच अशा कारवायांतून लक्ष्य केले जात असून भाजपमध्ये जाणारी मंडळी कशी सुटतात अशा आशयचं हे पत्र होतं. मात्र त्यानंतर देखील कारवाया सुरूच असून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांची चौकशी करण्यात आली आहे. लालू यादव यांच्या चौकशीनंतर त्यांच्या मुलीने संताप व्यक्त केला आहे.

सीबीआयची एक टीम मंगळवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरी दाखल झाली. लालू यादव हे सध्या मिसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी वास्तव्याला आहेत. याच ठिकाणी ही टीम दाखल झाली. सीबीआयची ही चौकशी जवळपास अडीच तास सुरू होती. IRCTC घोटाळा म्हणजेच लँड फॉर जॉब स्कॅम संदर्भात ही चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आहे.

सीबीआयकडून सुरू असलेल्या या चौकशीसंदर्भात लालू यादव यांची मुलगी रोहिणीनं ट्विट केलं आहे. ‘आपल्या वडिलांना सातत्यानं त्रास दिला जात आहे. जर त्यांना काही झालं तर मी कुणालाच सोडणार नाही. वडिलांना त्रास दिला जात आहे ही चांगली गोष्ट नाही. हे सगळं मी लक्षात ठेवेन. काळ सर्वांहून बलवान असतो. यातच सर्वात मोठी ताकद असते हे लक्षात ठेवा. हे लोक माझ्या वडिलांना त्रास देत आहेत, त्यांना काही त्रास झाला तर दिल्लीची खुर्ची हलवून सोडू. आता सहनशीलतेची मर्यादा उत्तर देत आहे’, असा इशारा देखील रोहिणी यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.