नीती आयोगाच्या माजी सीईओंवर गुन्हा दाखल करण्यास सीबीआयला परवानगी

आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात आता माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यापाठोपाठ नीती आयोगाच्या माजी सीईओ सिंधुश्री खुल्लर ,लघु ,मायक्रो आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे माजी अवर सचिव अनुप पुजारी,केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे निदेशक प्रबोध सक्सेना ,आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे माजी अवर सचिव रबिन्द्र प्रसाद या बड्या नोकरशहांवर गुन्हे दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने तशी परवानगी या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयला दिली आहे. चिदंबरम यांच्या नंतर आता या घोटाळ्याच्या चौकशीचक्रात माजी अधिकारीही अडकणार आहेत. आयएनएक्स मीडियाला नियमापेक्षा अधिक अधिक विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी दिल्याचा आरोप या सर्वांवर ठेवला जाणार आहे.

नीती आयोगाच्या माजी सीईओ सिंधुश्री खुल्लर या 2004 ते 2008 या काळात केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव होत्या.पुजारी 2006 ते 2010 या काळात या विभागाचे सहसचिव होते. तर सक्सेना 2008 ते 2010 या काळात याच विभागाचे निदेशक होते.

एफआयपीबीच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सीबीआयचे आरोपपत्र
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) 15 मे 2017 ला विदेशी गुंतवणूक प्रमोशन बोर्डाविरूद्ध (एफआयपीबी ) एफआयआर दाखल केला आहे. आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणुकीची परवानगी देताना झुकते माप दिल्याचा ठपका या आरोपपत्रात बोर्डाचे तत्कालीन अधिकारी आणि केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांच्यापाठोपाठ आता अर्थ मंत्रालयातील बडे अधिकारीही सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत. आयएनएक्स मीडिया हि पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मालकीची कंपनी आहे. चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदावर असताना या कंपनीला झुकते माप दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगचा गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या